मनपा हद्दीत मतदार यादी तरी अद्ययावत करू द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:05 IST2021-08-21T04:05:02+5:302021-08-21T04:05:02+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूक याचिकेवर लवकर सुनावणी घ्यावी, तसेच मतदार यादी अद्ययावत करण्यास परवानगी देण्याची विनंती राज्य निवडणूक ...

मनपा हद्दीत मतदार यादी तरी अद्ययावत करू द्या!
औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूक याचिकेवर लवकर सुनावणी घ्यावी, तसेच मतदार यादी अद्ययावत करण्यास परवानगी देण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.
महापालिकेची निवडणूक एप्रिल-मे २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. राज्य निवडणूक आयोगाने केलेली वॉर्ड रचना वादात अडकली. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कोरोना संसर्गाची स्थितीही नियंत्रणात आल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदांच्या निवडणुका घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद महापालिकेबरोबरच नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने २० ऑगस्ट २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाला एक विनंती अर्ज दाखल केला आहे. प्रलंबित याचिकेवर लवकर सुनावणी घ्यावी. दरम्यानच्या काळात मतदार यादी अद्ययावत करण्याची परवानगी द्यावी. मतदार यादीचे काम हे निवडणूक कार्यक्रमाचा भाग नाही. याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच राज्य निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करील, असा शब्ददेखील आयोगाने न्यायालयाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.