लाडक्या गणरायाला आज निरोप
By Admin | Updated: September 8, 2014 00:54 IST2014-09-08T00:48:31+5:302014-09-08T00:54:30+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव उत्साहात पार पाडला आहे़ सोमवारी श्रींच्या विसर्जन मिरवणुका निघणार असून,

लाडक्या गणरायाला आज निरोप
उस्मानाबाद : जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव उत्साहात पार पाडला आहे़ सोमवारी श्रींच्या विसर्जन मिरवणुका निघणार असून, या निवडणुका शांततेत पार पाडाव्यात, असे आवाहन पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी केले आहे़ जिल्ह्यात १३६३ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. यात ३२४ गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली. पोलिस प्रशासनाने गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यातील ३५९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात होती़ तर सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील ७४ अधिकारी, १७०० कर्मचारी, होमगार्ड, परजिल्ह्यातील १६ अधिकारी, १०० कर्मचारी, एसआरपीएफची एक कंपनी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे़ विसर्जन मिरवणूक कालावधीत हाच फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे़ यंदा प्रथमच शहरातील विसर्जन विहिरीसोबतच हातलादेवी पायथ्याच्या खानापूर प्रकल्पामध्ये गणरायांच्या विसर्जनाची सोय करण्यात आली आहे.
खानापूर प्रकल्पातही होणार मूर्तीचे विसर्जन
उस्मानाबाद : शहरातील श्री विसर्जन विहिरीसोबतच यंदा हातला देवीच्या पायथ्याशी असलेल्या खानापूर प्रकल्पामध्येही मोठ्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. मूर्ती पाण्यामध्ये नेण्यासाठी पालिकेच्या वतीले खास बोटीची व्यवस्था केली आहे. याठिकाणी आवश्यक सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा शहरामध्ये गणेश मंडळांची संख्या वाढली आहे. बहुतांश मंडळांनी मोठ्या मूर्ती बसविण्यावर भर दिला. ही बाब लक्षात घेवून नगरपरिषदेच्या वतीने अशा मोठ्या मूर्तीच्या विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून हातलादेवीच्या पायथ्याशी असलेल्या खानापूर प्रकल्पामध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी अध्यावत बोटही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अग्निशामक दल आणि पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना मुंबई येथील बचाव पथकाच्या दोन कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण दिले आहे. शहरातील विसर्जन विहीर आणि खानापूर प्रकल्पावर प्रत्येकी ८ असे एकूण १६ कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच निर्माल्य एकत्रीत करण्यासाठी दोन्ही ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विजेचीही सुविधा पुरविण्यात आली आहे. याठिकाणी अग्निशामक दलही तैनात असेल, असे पालिका मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
बाणगंगा प्रकल्पात ‘श्रीं’च्या विसर्जनाची सोय
भूम : गणेश विसर्जन सोहळ्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे. यंदा बाणगंगा प्रकल्प भरला असल्याने या ठिकाणी ‘श्रीं’च्या विसर्जनाची सोय करण्यात आली आहे.
नगर परिषदेच्या वतीने गणेश विसर्जन सोहळ्यासाठी तयारी करण्यात आली. यंदा पाऊस झाल्याने बाणगंगा तलाव शंभर टक्के भरला असल्याने विसर्जन सोहळा करण्यासाठी न.प. कडून बाणगंगा मध्यम प्रकल्पावर खास करुन लाईटची व्यवस्था करण्यात आली. याठिकाणी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर न.प. च्या वतीने विसर्जन सोहळ्यानिमित्त न.प. चौकात मिरवणूक आल्यावर न.प. कडून प्रत्येक मंडळाचे स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी इतर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्व तयारी झाली असून, हा सोहळा शांततेत पार पडावा, यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन गटनेते संजय गाढवे यांनी केले आहे. (वार्ताहर)
श्रींच्या विसर्जन मिरवणुकीतील देखाव्यांसह इतर उपक्रम पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते़ गर्दीच्या काळात एखादी संशयीत वस्तू, एखाद्याच्या संशयीत हलचाली आढळून आल्यास त्याची माहिती त्वरित जवळील पोलिस ठाण्याशी अथवा पोलिस मुख्यालला द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी केले आले आहे़
पथकेही राहणार कार्यरत
श्रींच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान बॉम्ब शोधक व नाशक पथके, जलद प्रतिसाद पथके, बिनतारी संदेश यंत्रणा, साध्या कपड्यातील विशेष पोलिस पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी, छेडछाड विरोधी पथक कार्यरत राहणार आहे़ तसेच नियंत्रण कक्षात दंगल नियंत्रक पथके, जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत़
२२ मंडळांचा सहभाग
पोलिस प्रशासनाच्या वतीने शहर पोलिस ठाण्यांतर्गत शहरातील गणेश मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ या स्पर्धेत शहरातील २२ गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला असून, श्रींच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़ गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह भाविकांनी मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात, असे आवाहन शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आदिनाथ रायकर यांनी केले आहे़
गणेश विसर्जन सोहळ्यासाठी पोलिस कर्मचारी ३०, होमगार्ड ३४ व वरिष्ठ अधिकारी, एपीआय, पीएसआय, ‘एसआरपी- शेक्सन एक व आरसीपी चे ५ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. श्री विसर्जन शांततेत पार पडावे, यासाठी मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून विसर्जन सोहळ्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक रणजित सावंत यांनी सांगितले.
गणेश विर्सजन सोहळ्यासाठी महसूल विभागाकडून ज्या मार्गावरुन मिरवणुका निघणार यासाठी महसूलचे १२ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका तर ग्रामीण भागात मंडळ अधिकारी व त्या-त्या गावातील तलाठी हे सोहळ्याची संपूर्ण माहिती तहसीलदारांना कळविणार आहेत. त्यासाठी सर्व गणेश मंडळांनी विसर्र्जन सोहळा शांततेत पार पाडून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे तहसीलदार अरविंद बोळंगे म्हणाले.
लोहारा : शहरामध्ये परवानाधारक १२ मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली आहे. तसेच बाल गणेश मंडळेही मोठ्या प्रमाणात आहेत. मागील अनेक वर्षांपासून शहरातील पोलिस ठाण्यालगत असलेल्या छोट्या सार्वजनिक तलावात ‘श्री’ विसर्जन केले जाते असे. परंतु, यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्यामुळे तलाव पूर्ण कोरडाच आहे. त्यामुळे यंदा गणेश मंडळे आपापल्या सोयीप्रमाणे शहरालगत असलेल्या विहिरींमध्ये तर काही गणेश मंडळे मोघा येथील तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करणार आहेत.
उमरगा : शहर व परिसरातील दीडशे गणेश मंडळाच्या गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला असून, बंदोबस्तासाठी होमगार्डसह जवळपास १५० पोलिस कर्मचारी तैैनात करण्यात आले आहेत.
शहरात एकूण परवानाधारक ३५ गणेश मंडळे आहेत. तर उमरगा पोलिस ठाण्यांतर्गत १०५ गणेश मंडळाचा समावेश आहे. श्री च्या विसर्जनासाठी शहरातील पतंगे रोड विहिरीत घरगुती मूर्त्यांचे विसर्जन केले जाणार आहे. तर उर्वरित मूर्तीचे विसर्जन भारत विद्यालयाच्या शेजारी उभारण्यात आलेल्या कृत्रीम पाणी साठ्यात करण्यात येणार आहे. मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी १०० पोलिस कर्मचाऱ्यांसह एक एसआरपी तुकडी, होमगार्ड पुरुष, महिला कर्मचारी तैैनात आहेत. विसर्जन मिरवणुकांवर सहाय्यक पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, पोनि सुनिल निकाळजे, सपोनि विलास गोबाडे, शिवाजी जाधव, सत्तार शेख, पोलिस उपनिरीक्षक विश्वजीत कासले यांच्यासह आदी अधिकाऱ्यांची नजर असणार आहे. (प्रतिनिधी)