दुष्काळात तगाद्यासाठी अधिकाऱ्यांना धडे

By Admin | Updated: July 18, 2014 01:46 IST2014-07-18T00:21:53+5:302014-07-18T01:46:19+5:30

दिनेश गुळवे , बीड सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Lessons to educate in famine during the famine | दुष्काळात तगाद्यासाठी अधिकाऱ्यांना धडे

दुष्काळात तगाद्यासाठी अधिकाऱ्यांना धडे

दिनेश गुळवे , बीड
सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल कसे करावे, याचे प्रशिक्षण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गंभीर बाब म्हणजे प्रशिक्षणासाठी आलेल्या एका अधिकाऱ्यास तब्बल बॅँकेने ५० हजार रुपये मानधन दिले आहे.
बीड जिल्हा सहकारी बॅँकेची अनेक शेतकऱ्यांकडे तब्बल ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जाची बाकी आहे. तसेच बॅँकेकडेही ५०० कोटींपेक्षा अधिक रुपये ठेवीदारांचे आहेत. यामुळे शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल करण्यासाठी बॅँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले.
निवृत्त अतिरिक्त निबंधक एस. बी. पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना वसुली कशी करावी यासह इतर बाबींचे मार्गदर्शन केले. पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत वसुलीसाठी कारवाई करणे योग्य नसल्याचे मत शेकापचे भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केले आहे. गंभीर बाब म्हणजे वसुलीचा हंगाम हा १ नोव्हेंबर ते ३० जून दरम्यान असतो, असे असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांना आताच प्रशिक्षण का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
सध्या बॅँकेकडे ठेवीदारांचे पैसे देण्यास पैसे नाहीत. ठेवीदार आजारपण, मुलींचे लग्न यासह विविध कारणांसाठी बॅँकेचे खेटे घालीत आहेत. त्यांची केवळ पाच ते दहा हजारांवर बोळवण केली जाते, अशा परिस्थितीत मार्गदर्शकांना तब्बल ५० हजार रुपये दिल्याने ठेवीदारांतून संताप व्यक्त केला जात आहे. या बाबत प्रशासक मुकणे म्हणाले की, कर्जवसुलीसाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहेत. तर, व्यवस्थापक कदम यांनीही त्यांचीच री ओढली.

Web Title: Lessons to educate in famine during the famine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.