सोयगाव तालुक्यात बिबट्या पडला विहिरीत
By Admin | Updated: December 6, 2014 00:18 IST2014-12-06T00:10:08+5:302014-12-06T00:18:22+5:30
सोयगाव : तालुक्यातील नांदगाव येथील एका शेतातील विहिरीमध्ये शिकारीचा पाठलाग करणारा बिबट्या पडला

सोयगाव तालुक्यात बिबट्या पडला विहिरीत
सोयगाव : तालुक्यातील नांदगाव येथील एका शेतातील विहिरीमध्ये शिकारीचा पाठलाग करणारा बिबट्या पडला. गुरुवारी मध्यरात्री पडलेल्या बिबट्यास शुक्रवारी वनविभागाच्या पथकाने दिवसभर परिश्रम घेऊन सुखरूप बाहेर काढले. बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी झालेली होती.
नांदगाव येथील शेतकरी गुरुमुख राठोड यांच्या कलकत्ता शिवारात गट क्र. ११ मधील विहिरीत गुरुवारी रात्री शिकारीच्या मागे लागलेला बिबट्या पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये पडला. सकाळी ६ वाजता शेतकरी गुरुमुख राठोड पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीजवळील पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत जिवंत बिबट्या दिसला. भयभीत झालेले गुरुमुख राठोड यांनी गावात जाऊन सरपंच नरेंद्र पाटील यांना माहिती दिली. पाटील यांनी पोलीस व वनविभागाला माहिती कळविली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एन. गायकवाड यांना माहिती दिली. त्यांनी उपवनरक्षक एस.डी. भोसले यांना कळविले.
उपवनरक्षक एस.डी. भोसले, व्ही.एस. गायकवाड, एस.वाय. गवंडर, एम.के. राठोड, सुरडकर, सी.यू. साबळे, के.जी. जाधव, एच.के. वाघ, व्ही.पी. शेजवळ, आर.एल. भडके, कृष्णा महाकाळ, आर.पी. झोंड, सुखदेव दांडगे, मुकेश गुप्ता, कडू इंगळे आदी वनकर्मचारी, पोलीस जमादार मोरे, सुलाने, शैलेश राज, फकिरा तडवी आदींनी सहकार्य केले. या बिबट्याला उपचारासाठी नंतर औरंगाबादला हलविण्यात आले.