बिबट्याने उचलून नेलं अन् कवळा जीव घेतला...

By | Updated: November 28, 2020 04:11 IST2020-11-28T04:11:27+5:302020-11-28T04:11:27+5:30

ग्राऊंड रिपोर्ट कडा (जि. बीड) : तुरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेंगा खात असलेल्या स्वराजवर झडप घातली आणि ...

The leopard picked up Ankwala and took his life ... | बिबट्याने उचलून नेलं अन् कवळा जीव घेतला...

बिबट्याने उचलून नेलं अन् कवळा जीव घेतला...

ग्राऊंड रिपोर्ट

कडा (जि. बीड) : तुरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेंगा खात असलेल्या स्वराजवर झडप घातली आणि एकच आरडाओरडा झाला. शिवार सैरभैर झाले. स्वराजचे काका कृष्णा हिंगे, आजी मिरनबाई काकडे आणि आजूबाजूला असलेले गावकरी धावत सुटले. शिवारात कल्लोळ उठला. बिबट्याने स्वराजला तोंडात धरून धूम ठोकली खरी, पण जीवाच्या आकांताने मागे धावणारी माणसं बघून तो बावरला आणि त्याने स्वराजला रानात टाकून पळून गेला. दरम्यान त्याने स्वराजच्या नरडीचा घोट घेतला होता.

अख्खे गाव या घटनेने हादरले. गावात चूल पेटली नाही. साऱ्यांचे डोळे डबडबलेले. घरापुढे गावकऱ्यांची गर्दी जमली होती. स्वराजचे काका कृष्णा हिंगे सांगत होते ,‘उघड्या डोळ्यांनी घटना पाहताना जीव तिळतिळ तुटत होता. अघटित घडले.’ चिमुकला जीव डोळ्यादेखत गेला... ’असे सांगत त्याचे काका कृष्णा हिंगे यांनी अश्रुंना पुन्हा वाट करून दिली.

आजी मिरनबाईचे अश्रू खंडत नव्हते. माझा सोन्यासारखा नातू चिक्या माझ्याकडे आनंदात यायचा, राहायचा. मला सोडून जात नव्हता; पण आज माझ्यासमोर त्याला बिबट्याने उचलून नेले आणि कवळा जीव घेतला. काय म्हणला असेल माझ्या लेकराचा जीव, म्हणत त्यांनी फोडला

गावात आता घराच्या बाहेर निघावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतात तर सोडाच; पण घराच्या बाहेर पडायचे म्हटले तरी आता नको बाबा, आपले घरातच बसा, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे येथील ग्रामस्थ बबन तरटे म्हणाले.

चौकट.....

चार दिवसांपूर्वी सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गर्जे यांचा बिबट्याने जीव घेतला. आज गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या किन्ही गावातून पाहुण्याच्या चिमुकल्याचा बिबट्याने जीव घेतला. या भयानक प्रकारामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली असून वनविभागाने आता नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे यांनी केली आहे.

● या गावात तत्काळ पिंजरा लावला असून औरंगाबाद, अमरावती, आष्टी, पाटोदा येथील टीम दक्ष झाल्या आहेत. त्याला पकडण्यासाठी वनविभाग सतर्क झाला असून लवकरच जेरबंद करू, असे आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

● वनविभागाने आता बिबट्याला पकडण्यासाठी आणखी प्रयत्न करायला हवेत. आणखी मनुष्यबळ बोलवा. तो नरभक्षक बनला आहे. त्यामुळे त्याला तत्काळ जेरबंद करून येथील दहशत कमी करा, अशी सूचना विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी केली.

Web Title: The leopard picked up Ankwala and took his life ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.