अंबाजोगाई परिसरात आढळला बिबट्या
By Admin | Updated: April 29, 2017 23:21 IST2017-04-29T23:18:45+5:302017-04-29T23:21:45+5:30
अंबाजोगाई : तालुक्यातील येल्डा परिसरातील दाट जंगलामध्ये शनिवारी दुपारी बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली

अंबाजोगाई परिसरात आढळला बिबट्या
अंबाजोगाई : तालुक्यातील येल्डा परिसरातील दाट जंगलामध्ये शनिवारी दुपारी बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याला पकडण्यात वनविभागाला अपयश आले. मात्र, वनविभागाचे अधिकारी व काही ग्रामस्थांच्या नजेरस तो पडला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरापासून सहा किमी अंतरावर २०० एकरवर दाट झाडी आहे. दुपारी अडीच वाजता शेतकाम करणाऱ्या सर्जेराव शेंडगे, व्यंकटेश चामनर, अशोक खोडवे, तुकाराम शेंडगे, कालिदास खोडवे यांनी त्यास पहिल्यांदा पाहिले. त्यांना तो वाघासारखा दिसला. ही खबर संपूर्ण शहर व तालुक्यात पसरली. त्यानंतर येल्डा परिसरात बघ्याची गर्दी झाली. रणरणत्या उन्हात नागरिक त्याला पाहण्यासाठी जमा झाले होते.
दरम्यान, अंबाजोगाई येथील वन परिमंडळ अधिकारी शंकर वरवडे यांनी वन कर्मचारी जी. बी. कस्तुरे, ज्ञानोबा हेडे यांच्यासमवेत धाव घेतली. यावेळी बिबट्या त्यांच्या नजरेस पडला. मात्र, क्षणार्धात तो दाट झाडीत पळून गेला. वन परिमंडळ अधिकारी वरवडे म्हणाले, बिबट्या वनसंपदा व तृणभक्षी प्राणी असलेल्या क्षेत्रात आढळून येतो. येल्डा परिसरात त्याच्यासाठी अनुकूल वातावरण आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. बिबट्याचा पाठलाग करू नका व त्यास छेडू नका, असे आवाहन त्यांनी केले. पिकांची नासधूस करणाऱ्या रानडुकरांना आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्यास नुकसान भरपाई देऊ, असे ते म्हणाले. (वार्ताहर)