लिंबू, मिरचीचे भाव गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 00:58 IST2016-03-19T00:15:45+5:302016-03-19T00:58:39+5:30
राजेश खराडे , बीड अत्यल्प पावसाचा परिणाम आता फळ पिके आणि भाजीपाल्यांवरही जाणवू लागला आहे. उन्हाची दाहकता वाढताच पालेभाज्यांची आवक घटली आहे,

लिंबू, मिरचीचे भाव गगनाला
राजेश खराडे , बीड
अत्यल्प पावसाचा परिणाम आता फळ पिके आणि भाजीपाल्यांवरही जाणवू लागला आहे. उन्हाची दाहकता वाढताच पालेभाज्यांची आवक घटली आहे, शिवाय लिंबू या फळपिकाचेही दरवर्षीप्रमाणे यंदाही भाव गगनाला भिडले आहे. किलोवर विक्रीवर होणारे लिंबू आता नगावर आले आहे, तर मिरचीही शंभर रूपये किलोप्रमाणे विकली जात आहे.
अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी सर्व भाजीपाल्यांचे दर मध्यम स्वरूपाचे होते. उन्हाची तीव्रता वाढल्याने मिरची, गवार, वांगे आदींची आवक घटली आहे, तर आष्टी आणि परळी वगळता इतर ठिकाणांहून लिंबाची आवक ठप्प झाली आहे. त्यामुळे ५ रूपयाला एक लिंबू मिळत आहे. जिल्ह्यात लिंबाच्या फळपिकाचे क्षेत्र १ हजार २१० हेक्टर असून, आष्टी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ८६० एवढे आहे, तर त्यापाठोपाठ परळी तालुक्यात १५० हेक्टरवर लागवड आहे.
सर्वत्र कागदी लिंबे घेतली जात आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या मध्यावर लिंबाचे भाव वाढत असतात; मात्र यंदा उन्हाळा सुरू होताच भाव कडाडले आहेत. जागोजागी वाढलेले रसवंतीगृह, शीतपेय दुकानांमुळे लिंबाची मागणी वाढत आहे. येथील खासबागेतील आडत मार्केटमध्ये लिंबू फळपीक दाखल होण्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी त्याची ‘अॅडव्हान्स बुकिंग’ केली असल्याचे पाहावयास मिळाले आहे.
दुसरीकडे मिरचीची लागवड ७५० हेक्टर असून, पाण्याअभावी हिरव्या मिरच्यांच्या भावाने शतक गाठले आहे, तर वाळलेल्या मिरच्या दोनशे रूपये किलोप्रमाणे विकल्या जात आहेत.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पालेभाज्या आणि फळपिकांचे दर वाढले असून, आगामी काळातही यामध्ये भर पडणार असल्याचे येथील व्यापारी दिनकर काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.