जिल्ह्यात दिग्गज नेत्यांनी गड राखले
By Admin | Updated: March 15, 2017 00:01 IST2017-03-15T00:00:59+5:302017-03-15T00:01:27+5:30
जालना : पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत दिग्गज नेत्यांनी आपले गड कायम राखले.

जिल्ह्यात दिग्गज नेत्यांनी गड राखले
जालना : पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत दिग्गज नेत्यांनी आपले गड कायम राखले. भोकरदन व जाफराबाद पं.स वर खा. रावसाहेब दानवे यांनी वर्चस्व कायम ठेवले. आ. राजेश टोपे यांनी अंबड व घनसावंगी येथे आपला दबदबा ठेवला. परतूर व मंठ्यात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी बहुमत सिद्ध करीत वर्चस्व ठेवले. बदनापूर समितीसह जालना समितीचे सभापती पद पटकावित राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे सिद्ध केले.
शिवसेनेने वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जालन्यात शिवसेना- काँग्रेस आघाडी होऊन शिवसेनेने सभापतीपद तर कॉंग्रसेने उपसभापतीपद मिळविले. एकूणच या नवीन राजकीय आघाडीची जिल्ह्यात सर्वदूर चर्चा रंगत आहे.
जिल्ह्यातील आठ पंचायत समितीसाठी सभापती व उपसभापतींची निवड मंगळवारी झाली. चार पं.स.वर भाजपाने वर्चस्व मिळविले. दोन पंचायत समिती राष्ट्रवादीकडे तर बदनापूर पं.स.वर शिवसेनेने वर्चस्व राखले. जालन्यात शिवसेना व काँग्रेस अशी नवीन आघाडी झाली.
जालना पंचायत समितीसाठी शिवसेना व काँग्रेस आघाडी होऊन सभापतीपदी शिवसेनेचे पांडुरंग डोंगरे तर उपसभापती काँग्रेसच्या द्वारकाबाई खरात यांची निवड झाली. जालना पंचायत समितीच्या १८ जागा आहेत. त्यात शिवसेना सात, भाजपा सात, काँग्रेस चार व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल होते. अंबड पं.स.च्या दोन पदावर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व रखले. अंबड मध्ये एकूण१६ जागा असून राष्ट्रवादी दहा भाजपाने सहा जागांवर विजय मिळविला. सभापतीपदी सरला सीताराम लहाने तर उपसभापती किशोर नरवडे यांची बिनविरोध निवड झाली. घनसावंगी पंचायत समितीवर राष्ट्रवादीने दबदबा कायम ठेवत दोन्ही पदे ताब्यात घेतली. सभापती मंजुषा कोल्हे व उपसभापतीपदी आशामती उगले यांची निवड झाली. घनसावंगीत राकाँचे १०, सेनेचे ५ तर अपक्ष १ असे सदस्य संख्या होती. परतूरमध्ये भाजपाने दोन्ही जागांवर वर्चस्व राखले. यात सभापतीपदी शीतल तनपुरे तर उपसभापती म्हणून प्रदीप ढवळे यांची निवड झाली. मंठ्यात भाजपाने वर्चस्व प्रस्थापित करीत दोन्ही पदे मिळविली. सभापतीपदी स्मिता राजेश म्हस्के यांची सभपती तर उपसभापती कल्याण खरात यांची निवड झाली. जाफराबादच्या पं.स समितीसभापती भाजपाच्या साहेबराव कानडजे तर उपसभापती भाजपाच्याच वैशाली मुळे यांची निवड झाली. बदनापूर पं.समध्ये शिवसेनेकडे दोन्ही पदे आली. सभापतीपदी भरत मदन तर उपसभापती श्रीराम कानडे यांची निवड झाली. भोकरदनमध्ये भाजपाकडे दोन्हीपदे कायम राहीली. सभापतीपदी विलास आडगावकर तर उपसभापती गजानन नागवे यांची निवड झाली.
जालना पंचायत समितीसाठी शिवसेना व काँग्रेस ही आघाडी नवीन राजकीय समीकरणाची नांदी ठरेल का, अशी चर्चा रंगत आहे. सेना व भाजपाचे पक्षीय बलाबल समान असताना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सत्ता कायम ठेवण्यासाठी वेगळी राजकीय रणनीती आखत काँग्रेसशी सोयरीक करून सभापतीपद पटकावले. ही आघाडी जि.प.अध्यक्षपदाच्या वेळीही नवीन जादू करणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.