‘सीईओ’ घेणार विधिज्ञांचा सल्ला
By Admin | Updated: June 5, 2017 00:32 IST2017-06-05T00:29:30+5:302017-06-05T00:32:03+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या कन्नड येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पातील लिपिकांनी संगनमत करून पोषण आहाराच्या बिलाचा तब्बल १४ लाखांचा अपहार केला आहे

‘सीईओ’ घेणार विधिज्ञांचा सल्ला
ल्ोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या कन्नड येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पातील लिपिकांनी संगनमत करून पोषण आहाराच्या बिलाचा तब्बल १४ लाखांचा अपहार केला आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत विधिज्ञांचा सल्ला घेतला जाणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महिला व बालकल्याण विभागांतर्गत कन्नड येथील क्रमांक- १ एकात्मिक बालविकास प्रकल्पाद्वारे अंगणवाड्यांतील बालके, स्तनदा माता, गरोदर माता, किशोर मुलींना स्थानिक बचत गटांमार्फत पोषण आहार तयार करून दिला जातो. पोषण आहार पुरवठा करणाऱ्या बचत गटांचे जवळपास १८ लाख रुपयांचे बिल तयार करण्यासाठी तत्कालीन प्रभारी प्रकल्प अधिकारी तथा पर्यवेक्षिका दांगोडे यांनी जि. प. मुख्यालयात कार्यरत लिपिक भगवान काळे यांना बोलावून घेतले. भगवान काळे आणि बालविकास प्रकल्प कार्यालयातील अन्य काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करून जवळपास १४ लाख रुपयांचा अपहार केला. हे प्रकरण एप्रिल- मे २०१६ मध्ये घडलेले आहे. काही दिवसांनंतर तत्कालीन प्रकल्प अधिकारी तथा पर्यवेक्षिका दांगोडे या त्यांच्या मूळ पदावर रुजू झाल्या व त्यांच्या जागी पर्यवेक्षिका बनकर यांनी पदभार घेतला. तेव्हा लिपिकांनी बिलात अपहार केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांनी सहायक लेखाधिकारी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. समितीने चौकशीचे काम पूर्ण केले असून, चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे.
चौकशीमध्ये भगवान काळे यांच्यासह अन्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर ठपका ठेवलेला आहे. भगवान काळे यांचा फेब्रुवारी महिन्यात अपघाती मृत्यू झाला आहे. हे प्रकरण अधिक गंभीर असून, फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंबंधी सध्या जिल्हा परिषदेच्या विधि सल्लागारांकडून माहिती घेतली जात आहे.