महापालिकेच्या शाळेत ई-लर्निंगद्वारे मिळणार शिक्षणाचे धडे
By Admin | Updated: May 16, 2014 00:15 IST2014-05-15T23:23:26+5:302014-05-16T00:15:42+5:30
भारत दाढेल, नांदेड महापालिकेच्या शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी मनपा शाळेत या शैक्षणिक वर्षापासून ई- लर्निंग शाळा सुरू होत आहे़

महापालिकेच्या शाळेत ई-लर्निंगद्वारे मिळणार शिक्षणाचे धडे
भारत दाढेल, नांदेड महापालिकेच्या शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी मनपा शाळेत या शैक्षणिक वर्षापासून ई- लर्निंग शाळा सुरू होत आहे़ या प्रकल्पासाठी ३८ लाख ८७ हजार रूपये मिळाले आहेत़ मनपा शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत़ दप्तराच्या ओझ्यातून विद्यार्थ्यांची मुक्तता करण्यासाठी व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी मनपाच्या शाळेत ई- लर्निंग ची सुविधा सुरू करण्यात येत आहे़ या स्कूलमध्ये प्रत्येक वर्गात डिजिटल स्क्रीन बोर्ड राहणार असून नामांकित शाळेत वापरले जाणारे विविध प्रकारचे शैक्षणिक सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत़ या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्यायन करण्याची आवड निर्माण होईल़ गणित, विज्ञान अशा किचकट विषयाचा अभ्यासक्रम सुलभरित्या विद्यार्थ्यांना समजावून सांगणे शिक्षकांनाही सोयीचे होणार आहे़ इंटरनेटची सुविधा असल्याने विद्यार्थ्यांचा थेट जगाशी संपर्क होणार आहे़ मनपाचे शिक्षणाधिकारी भागवत जोशी म्हणतात... सध्याचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे व त्यातही संगणक युग म्हणून ओळखल्या जाते़ यापुढे संगणकाशिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होणे शक्य नाही़ मानवी जीवनातील संगणक वापराचे व उपयोगाचे महत्व मनपाच्या सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेले, दुर्बल व वचिंत घटकातील तसेच अल्पसंख्य समाजातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येणार आहे़ महापालिका शाळेत यंदा विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत़ विद्यार्थ्यांच्या गुणवतावाढीसाठी स्पर्धा परिक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, हस्ताक्षर सुधार उपक्रम, नंदीग्राम मैत्री उपक्रम व टोकन रिवार्ड बोर्ड आदी कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत़ इतर खासगी शाळांच्या तुलनेत मनपा शाळेतील विद्यार्थी मागे राहू नयेत, याची खबरदारी घेत शिक्षणाधिकारी जोशी यांनी प्रयत्न चालविले आहेत़ प्रोजेक्टरही बसणार मनपाच्या १७ शाळेत २५ इंटीग्रेटेड कॅम्प्युटर प्रोजेक्टर बसविण्यात येणार आहेत़ याची किंंमत २५ लाख रूपये आहे़ १ ली ते ४ थीपर्यंतच्या शाळेत १, ७ वीपर्यंतच्या शाळेत २ तर ८ वी ते १० वीपर्यंतच्या शाळेत २ प्रोजेक्टर बसविण्यात येणार आहेत़ एकूण ३८ लाख ८७ हजार रूपयांचा निधी या प्रकल्पासाठी मिळाला आहे़ शालेय परिसरात सर्व्हेक्षणाचे आदेश आरटीई - २००९ नुसार परिसरातील ६ ते १४ वयोगटातील मुला- मुलींना प्रवेश देणे अनिवार्य आहे़ त्यासाठी शिक्षकांच्या सहकार्याने शालेय परिसरात सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी भागवत जोशी यांनी दिले आहेत़ मनपाच्या शाळेत ई - लर्निंग सुरू होत असल्याने जास्तीत जास्त मुलांना होण्यासाठी शाळा व शाळा व्यवस्थापन स्तरावर जाहीरात, डिजिटल फलक लावून, गृह भेटीद्वारे प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत़ दर्जेदार शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील पाल्यांना महागड्या शाळेत प्रवेश मिळत नाही़ त्यामुळे दर्जेदार शिक्षणापासून ही मुले वंचित राहतात़ पुणे मनपाने राजीव गांधी ई- लर्निंग स्कूलचा यशस्वी उपक्रम राबविला़ हाच उपक्रम नांदेड मनपाने हाती घेतला़ अभ्यासक्रम सुलभ वाटावा, यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर केलेले अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीने ज्ञानार्जन करण्यात येईल़ त्यासाठी प्रशिक्षित असलेले शिक्षकही उपलब्ध होणार आहेत़