प्रत्यक्ष प्रयोगातून शिका वैज्ञानिक गंमती जमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:35 IST2017-11-12T00:35:33+5:302017-11-12T00:35:38+5:30
द यलो डोअर’तर्फे ‘प्रथम’च्या साह्याने १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान लोकमत भवन येथे एक भन्नाट ‘वैज्ञानिक कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे

प्रत्यक्ष प्रयोगातून शिका वैज्ञानिक गंमती जमती
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये अद्यापही पाठांतरावर अधिक जोर दिला जातो. विज्ञानासारख्या विषयाच्या बाबतीत तर हे अधिकच मारक ठरते. अशा ‘पोपटपंची’ दृष्टिकोनामुळे विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पनाच उमजत नाही. मुळात विज्ञान शिकताना नावीन्यता, सृजनशील विचार आणि प्रायोगिक शिक्षण पद्धती गरजेची असते.
हीच बाब लक्षात घेऊन ‘द यलो डोअर’तर्फे ‘प्रथम’च्या साह्याने १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान लोकमत भवन येथे एक भन्नाट ‘वैज्ञानिक कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. या विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करणे, विविध उपकरणे हाताळणे आणि आपले नैसर्गिक कुतूहल अजमावून पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वय वर्ष ९ ते १५ या गटातील मुलांना या कार्यशाळेत सहभागी होता येईल.
‘जपानच्या मोनोरेलसारख्या अत्यंत क्लिष्टवैज्ञानिक संकल्पनाही साधी-साधी उपकरणे आणि साहित्यांचा वापर करून शिकविल्या जाऊ शकतात. त्यामागील अपकर्षणाचे विज्ञान समजून घेणे फारसे अवघड नाही. विद्यार्थ्यांना समजेल अशा रंजक प्रकारे शिकविले की त्यांना चटकन कळते. तेच काम या विज्ञान कार्यशाळेत केले जाणार आहे’, अशी माहिती ‘द यलो डोअर’च्या प्रतिनिधीने दिली.
या कार्यशाळेत निरीक्षण, प्रयोग, पॅटर्न ओळखणे, तर्क, हाताने मॉडेल तयार करणे आदी गोष्टींच्या आधारे मूलभूत वैज्ञानिक संकल्पना उलगडून दाखविण्यावर भर देण्यात येणार
आहे.
कार्यशाळेच्या सात दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांचे प्रशिक्षण देण्यात येईल. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी (२६ नोव्हेंबर) वैज्ञानिक मेळावा (सायन्स फेअर) भरणार आहे. यामध्ये स्वत: विद्यार्थीच मेळाव्याला भेट देणा-यांना विविध प्रयोग आणि वैज्ञानिक संकल्पनांविषयी माहिती देतील. यामुळे एक तर विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होतील आणि त्याचा फायदा त्यांना पुढील उच्चशिक्षणासाठी होईल. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचाही हेतू यातून साध्य होणार आहे.
कार्यशाळेमध्ये सहभागी होणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अशा या अनोख्या आणि भन्नाट कार्यशाळेत आपल्या पाल्याला प्रवेश देऊन आपण त्यांच्या वैचारिक प्रगतीला वाव मिळवून देऊ शकता. तर मग विचार कसला करता? आजच आपला सहभाग निश्चित करण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क
साधा.