गुरूंच्या चरणी लीन
By Admin | Updated: July 13, 2014 00:40 IST2014-07-13T00:36:56+5:302014-07-13T00:40:47+5:30
औरंगाबाद : जीवनाला दिशा देत प्रेरणा देणाऱ्या गुरूंच्या चरणी लीन होऊन आज शिष्यांनी गुरू- शिष्य परंपरेचे दर्शन घडवले.
गुरूंच्या चरणी लीन
औरंगाबाद : जीवनाला दिशा देत प्रेरणा देणाऱ्या गुरूंच्या चरणी लीन होऊन आज शिष्यांनी गुरू- शिष्य परंपरेचे दर्शन घडवले. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजनापासून ते नेत्रदान शिबिरापर्यंत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी शहर गजबजून गेले होते. विशेषत: गजानन महाराज मंदिर, साईबाबा मंदिर, बाळकृष्ण महाराज मंदिर, रेणुकामाता मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, स्वामी मच्छिंद्रनाथ मंदिरासह विविध मंदिरांत सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिरात पहाटे काकडा आरतीने सुरुवात झाली. महाराजांची पूजा झाल्यानंतर भाविकांनी दर्शनास सुरुवात केली. महाराजांच्या दर्शनासाठी औरंगाबादच नव्हे तर आसपासच्या परिसरातूनही भाविक आले होते. सायंकाळी दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. अनेक भाविक सहपरिवार आले होते.
औरंगपुऱ्यातील एकनाथ महाराज मंदिर, श्रीदत्त मंदिर तसेच बाळकृष्ण महाराज मंदिरातही विधिवत गुरुपूजन करण्यात आले. सद्गुरू लक्ष्मीकांत महाराज आजूबाई संस्थानच्या वतीने सिडको एन-९ येथून सद्गुरूंच्या पादुकांची शोभायात्रा काढण्यात आली. सप्तपदी मंगल कार्यालयात पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमले होते. बीड बायपास परिसरातील हरिहर शक्तिपीठ आश्रमात अप्पा महाराजांचे प्रवचन झाले यानंतर भाविकांनी भक्तिपदे म्हटली. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या शिष्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. यावेळी पं. विजयकुमार पल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम झाले. स्वामी मच्छिंद्रनाथ मंदिरात डॉ. मंगलनाथ महाराजांचे पूजन करण्यात आले. नाथ संप्रदायातील नाना महाराज पाथर्डीकर यांचे गुरुपूजन करण्यात आले. यावेळी लघु रुद्राभिषेक करण्यात आला. रामचंद्र पारनेरकर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुरुप्रसादनगर, बाळापूर, सातारा मंदिर, शिवराम मंदिर, समर्थनगर, न्यायालयीन सोसायटी येथील पादुका मंदिरात शिष्यांनी पूजन केले. रात्री महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. व्यंकटेश मंगल कार्यालयात माई महाराज यांच्या गुरुपूजनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. येथे अनेकांनी गुरुमंत्र घेतला.
सामाजिक उपक्रम
हडकोतील स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपूजन करण्यात आले. यानंतर सामुदायिक स्वामी चरित्र व दुर्गा सप्तशतीचे पारायण झाले. याशिवाय भाविकांची मोफत नेत्र तपासणी, दंत चिकित्सा, आरोग्य तपासणी करण्यात आली.
पॅन कार्ड व विवाह नोंदणी करण्यात आली. पावसासाठी पर्जन्यसूक्ताचे वाचन करण्यात आले. सर्व उपक्रमांत युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.