न्यायालयाच्या इमारतीला गळती
By Admin | Updated: September 12, 2014 00:07 IST2014-09-11T23:46:25+5:302014-09-12T00:07:09+5:30
नांदेड : जिल्हा व सत्र न्यायालयाची बांधण्यात आलेली नवीन इमारत ठिकठिकाणी गळत असून या इमारतीच्या खोल्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे.

न्यायालयाच्या इमारतीला गळती
नांदेड : जिल्हा व सत्र न्यायालयाची बांधण्यात आलेली नवीन इमारत ठिकठिकाणी गळत असून या इमारतीच्या खोल्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे न्यायालयीन कामकाज करणाऱ्यांना येथे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी कामाचा दर्जा पहिल्याच पावसात उघडकीस आला.
बांधकाम विभागाने जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात नव्याने न्यायालयाची व न्यायाधिशांच्या निवासाकरीता वसाहतीचे बांधकाम केले. या बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून नव्याने बांधण्यात आलेल्या खोल्यांमधील भिंतीतून पाणी पाझरत आहे. तसेच खोल्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या इमारतीकरीता राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.
तळमजल्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले असून याबाबत येथे नियुक्त असलेल्या बांधकाम विभागाच्या निरीक्षकांशी प्रस्तूत प्रतिनिधीने चर्चा केली असता ते म्हणाले, जिल्हाधिकारी साहेबांकडे तळमजल्यावरच्या विकासाचा आराखडा प्रलंबित आहे. त्यांची परवानगी न मिळाल्याने येथील अशी परिस्थिती आहे.
न्यायालयाच्या प्रांगणाचा विकास व्हावा व हा परिसर सुशोधित करण्यात यावा, अशी मागणी न्यायालय प्रशासनाने बांधकाम विभागाकडे अनेक वेळा केली. जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांच्या परिसराचा कायापालट गुरु-ता-गद्दी त्रिशताब्दी महोत्सवाच्या निधीतून करण्यात आला.
परंतु न्यायालयाच्या इमारतीचा या निधीत समावेश का केला गेला नाही, असा प्रश्न येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पडतो आहे. (प्रतिनिधी)