नेतेमंडळींची आकडेमोड सुरू

By Admin | Updated: October 17, 2014 00:27 IST2014-10-17T00:18:24+5:302014-10-17T00:27:10+5:30

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तुळजापूर, उस्मानाबाद-कळंबसह चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांसह पदाधिकारी,

Leadership calculations continue | नेतेमंडळींची आकडेमोड सुरू

नेतेमंडळींची आकडेमोड सुरू


उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तुळजापूर, उस्मानाबाद-कळंबसह चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतांची आकडेमोड सुरू केली आहे़ मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बुधवारी दिवसभर प्रत्यक्ष भेटी घेण्यासह भ्रमणध्वनीवरून माहिती संकलित करण्यात येत आहे़ तर काही उमेदवार घरगुती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते़
तुळजापूर विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पंचरंगी लढत पहावयास मिळाली़ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजपाच्या मातब्बर नेतेमंडळींनी तुळजापूरातच सभा घेतल्याने तुळजापूर विधानसभा मतदार संघाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष वेधले आहे़ राष्ट्रवादीचे उमेदवार जीवन गोरे सकाळी तुळजापूर येथील एका घरगुती कार्यक्रमास हजेरी लावली़ दुपारनंतर पदाधिकाऱ्यांची चर्चा करून मतदानाबाबत चर्चा केली़ काँग्रेसचे उमेदवार मधुकराव चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रियेनंतर आकडेमोडीस सुरूवात केली आहे़ पदाधिकाऱ्यांशी अणदूर, तुळजापूर येथे त्यांनी चर्चा केली आहे़ तर गुरूवारी कौटुंबिक कामानिमित्त ते बाहेरगावी गेल्याचे सूत्रांनी सांगितले़ शिवसेनेचे उमेदवार सुधीर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांनीशी मतदान प्रक्रियेवर चर्चा केली असून, पाटील हे बुधवारी कौटुंबिक कारणास्तव सोलापूर येथे गेल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले़ तर भाजपाचे उमेदवार संजय निंबाळकर यांनी गुरूवारी सकाळी उस्मानाबादसह तुळजापूर शहरातील पदाधिकाऱ्यांशी मतदानप्रक्रियेबाबत वार्तालाप केला़ तसेच मनसेचे उमेदवार देवानंद रोचकरी यांनीही मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी मतदान प्रक्रियेबाबत चर्चा केली़
उस्मानाबाद-कळंब मतदार संघातही असेच चित्र पहावयास मिळाले़ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी सकाळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून चर्चा केली़ त्यानंतर सोलापूर येथे रूग्णालयात असलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेवून तब्येतीची विचारपूस केली़ सोलापूरला जाताना रस्त्यावरील गावामध्ये थांबून दोन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली़ शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी दिवसभरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत चर्चा केली़
काँग्रेसचे उमेदवार विश्वास शिंदे यांनी सकाळी शहरासह परिसरातील पदाधिकाऱ्यांशी उस्मानाबाद येथे बोलावून मतदान प्रक्रियेबाबत चर्चा केली़ शिवाय पुढील राजकीय बाबींवरही पदाधिकाऱ्यांना माहिती दिली़ तसेच भाजपाचे उमेदवार संजय दूधगावकर यांनी तडवळासह परिसरातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली़ दुपारनंतर कळंब तालुक्यातील खामसवाडी व परिसरातील पदाधिकाऱ्यांची भेट घेवून मतदान प्रक्रियेबाबत चर्चा केली़ एकूणच मतदान प्रक्रिया झाल्याने उमेदवारांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आकडेमोड करताना दिसत आहेत़ आकडेमोडीनंतर अंदाज वर्तविण्यात येत असले तरी रविवारी होणाऱ्या मतमोजणीनंतरच मतदारांचा कौल समोर येणार आहे़ (प्रतिनिधी)
भूम : भूम-परंडा-वाशी मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवारांनी मतदान प्रक्रियेनंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आकडेमोडीस सुरूवात केली आहे़ याच अनुषंगाने बुधवारी दिवसभर पदाधिकाऱ्यांसह मतदारांशी संपर्क साधून चर्चा करण्यावर भर दिला़ राष्ट्रवादीचे राहुल मोटे, शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील व भाजप-रासपाचे उमेदवार बाळासाहेब पाटील या तिघांनीही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मतदानाच आकडेमोड केली़ तसेच मतदार संघातील मतदारांशी चर्चा करून माहिती घेतली़

Web Title: Leadership calculations continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.