एलबीटीचा तिढा कायम...!
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:20:23+5:30
औरंगाबाद : एलबीटीबाबतचा तिढा सुटता सुटत नसल्यामुळे महापालिकेचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे. आज महापौर कला ओझा

एलबीटीचा तिढा कायम...!
औरंगाबाद : एलबीटीबाबतचा तिढा सुटता सुटत नसल्यामुळे महापालिकेचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे. आज महापौर कला ओझा यांच्या दालनात व्यापारी, प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत एलबीटीवर चर्चा झाली. मात्र, तोडगा काही निघाला नाही. व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्यास सध्या तरी नकार दर्शविला आहे. त्यामुळे मनपाची आर्थिक कोंडी सुरू झाली आहे.
येत्या आठवड्यात एलबीटीवर शासन स्तरावर तोडगा निघेल. तोपर्यंत पालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये, अशी भूमिका व्यापारी महासंघाने मांडली, तर महापौर ओझा यांनी एलबीटी भरून पालिकेला सहकार्य करावे. जो शासन निर्णय होईल तो मान्य केला जाईल, असे सांगितले.
महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राम भोगले यांनी एलबीटीमुळे उद्योजक व व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, टॅक्स भरण्यासाठी कुणाचाही विरोध नाही. कर पद्धत सुलभ असली पाहिजे. राज्यात समान करप्रणाली असली पाहिजे. शासनाने व्हॅटच्या माध्यमातून मनपाला वाटा द्यावा व व्यापाऱ्यांचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावावा.
महापौर ओझा यांनी व्यापारी, उद्योजकांच्या समस्या शासनाकडे मांडण्यात येतील. जोपर्यंत शासनाकडून एलबीटीचा तिढा सोडविला जात नाही तोपर्यंत एलबीटी भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले की, व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रयत्न करील. या बैठकीला सभापती विजय वाघचौरे, सभागृहनेते किशोर नागरे, गजानन बारवाल, गटनेते मीर हिदायत अली, अफसरखान, प्रफुल्ल मालानी, माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफरखान, सुरेंद्र कुलकर्णी, वीरभद्र गादगे, उपायुक्त सुरेश पेडगावकर, एलबीटी अधिकारी अय्युबखान, मासिआ, सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.