लक्ष्मीपूजनाने उत्साहात भर
By Admin | Updated: October 31, 2016 00:59 IST2016-10-31T00:56:49+5:302016-10-31T00:59:15+5:30
परभणी : रविवारी जिल्हाभरात ठिक ठिकाणी लक्ष्मीपूजन करण्यात आले़

लक्ष्मीपूजनाने उत्साहात भर
परभणी : रविवारी जिल्हाभरात ठिक ठिकाणी लक्ष्मीपूजन करण्यात आले़ भक्तीभावाने लक्ष्मीची पूजा करून त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़ त्यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय आणि उत्साहाचे झाले होते़
दोन दिवसांपासून जिल्ह्यात दिवाळी सणाला प्रारंभ झाला आहे़ ऊर्जेचे आणि उत्साहाचे प्रतिक असलेल्या या दीपोत्सवात दररोज विविध सण साजरे केले जातात़ रविवारी लक्ष्मीपूजन असल्याने सकाळपासूनच नागरिकांनी जोरदार तयारी केली़ शहरातील बाजारपेठ भागात केळीचे खांब, केळीचे पाने, झेंडुची फुले, पुजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती़ शनिवारनंतर रविवारी देखील बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेल्याचे पहावयास मिळाले़ लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळचा असल्याने दुपारी २ वाजेपासूनच लक्ष्मीपूजनाची तयारी होत होती़ घरोघरी सायंकाळच्या सुमारास रांगोळ्या रेखाटून आणि पणत्यांचे दिवे लावण्यात आले़
शहरातील बाजारपेठ भागातही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोर रांगोळ्या काढल्या़ दुकानांना झेंडुच्या फुलांची तोरणे बांधून सजविण्यात आले़ त्यानंतर लक्ष्मीपूजन करण्यात आले़ व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजनासह त्यांच्या वर्षभराच्या नोंद वह्या, पावती पुस्तके, पेन आदी साहित्याचे पूजन झाले़ सायंकाळी ५़३० पासून जिल्ह्यात लक्ष्मीपूजनाचा प्रारंभ झाला़ रात्री ९़३० पर्यंत विविध भागात लक्ष्मीपूजनाचे कार्यक्रम पार पडले़
लक्ष्मीपूजनामुळे सायंकाळी शहरात सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण शहर फटाक्याच्या आतषबाजीने उजळून निघाले होते. उत्साहपूर्ण आणि भक्तीभावाने रविवारी जिल्ह्याभरात लक्ष्मीपूजन साजरे करण्यात आले. (प्रतिनिधी)