जिल्ह्यात लक्ष्मीपूजन उत्साहात
By Admin | Updated: October 31, 2016 00:29 IST2016-10-31T00:28:16+5:302016-10-31T00:29:54+5:30
लातूर : रविवारी दिवाळीनिमित्त दिवसभर लक्ष्मीपूजनाची ठिकठिकाणी तयारी सुरू होती.

जिल्ह्यात लक्ष्मीपूजन उत्साहात
लातूर : रविवारी दिवाळीनिमित्त दिवसभर लक्ष्मीपूजनाची ठिकठिकाणी तयारी सुरू होती. सायंकाळी गोरज मुहूर्तावर लातूर शहरासह जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिकांसह घरा-घरांत महालक्ष्मीची पूजा उत्साहात करण्यात आली. गोरज मुहूर्तावर ६.०५ ते ८.४५ या कालावधीत व्यापारी आणि नागरिकांनी लक्ष्मीपूजन केले.
शहरातील गंजगोलाई आणि बार्शी रोडवरील रयतु बाजारात सकाळपासूनच लक्ष्मीपूजनासाठी लागणारे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. केळीचे खुट, नारळाच्या फांद्या, झेंडूंची फुले आणि पूजेचे साहित्य खरेदीला महिलांसह नागरिकांची मोठी गर्दी होती. रविवारी महालक्ष्मी पूजनानिमित्त लागणाऱ्या साहित्यांचे भावही वधारले होते. झेंडूंच्या फुलांना सोन्याचा भाव होता. झेंडूंच्या फुलांना ५० ते १०० रुपये प्रति किलोचा भाव होता. यासाठी ग्रामीण भागातील फूल विक्रेत्यांनी बाजारात झेंडूंची फुले मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणली होती.
लक्ष्मीपूजनानिमित्त घरा-घरांत रविवारी पहाटेपासूनच प्रसन्न वातावरण होते. सायंकाळी पणत्या लावण्यात आल्या होत्या. बच्चे कंपनीने फटाक्यांचा आनंद लुटला. आकाशात झेपावणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाने आसमंत उजळून निघाले होते. रात्रीच्या काळोखात फॅन्सी फटाक्यांच्या आतषबाजीने आनंद द्विगुणित झाला. गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात थाटण्यात आलेल्या फटाका बाजारात रविवारी मात्र फटाके खरेदीसाठी ग्राहकांची विक्रमी गर्दी होती. खरेदीची उलाढाल कोटींच्या घरात गेल्याचे फटाका व्यापाऱ्यांनी सांगितले. काही ठिकाणी सकाळपासूनच लक्ष्मीपूजनाचा उत्साह होता.