धूमधडाक्यात लक्ष्मीपूजन
By Admin | Updated: October 31, 2016 00:47 IST2016-10-31T00:43:10+5:302016-10-31T00:47:31+5:30
औरंगाबाद : सांजवेळ... दारासमोर रेखाटलेली सुंदर, कल्पक रांगोळी...पणतीचा मंद प्रकाश... आकाशकंदिल आणि विद्युत रोषणाईने निर्माण झालेला लखलखाट..

धूमधडाक्यात लक्ष्मीपूजन
औरंगाबाद : सांजवेळ... दारासमोर रेखाटलेली सुंदर, कल्पक रांगोळी...पणतीचा मंद प्रकाश... आकाशकंदिल आणि विद्युत रोषणाईने निर्माण झालेला लखलखाट... घरभर दरवळणारा अगरबत्ती, धूपचा सुगंध... मुहूर्तावर सुरूझालेले मंत्रोच्चार, शास्त्रोक्त पद्धतीने केलेली लक्ष्मीची पूजा, आराधना... आणि नंतर फटाक्यांची आतषबाजी करून धूमधडाक्यात शहरवासीयांनी रविवारी दिवाळी साजरी केली.
दिवाळीचा सण पाच दिवसांचा असला तरीही त्यात ‘लक्ष्मीकुबेर पूजन’ दिवस सर्वात महत्त्वाचा मानला गेला आहे. म्हणून तर रविवारी सायंकाळी शहरात चोहीकडे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ६.०१ ते ७.३६ (शुभ), रात्री ७.३६ ते ९.१० (अमृत) या मुहूर्तावर लक्ष्मीकुबेर पूजन करण्याचा मुहूर्त होता. त्यानुसार शहरवासीयांनी तयारी सुरूकेली होती. पूजेचा परिसर फुलांनी सजविण्यात आला होता... त्यावर लक्ष्मी, सरस्वती, श्रीगणेशाची प्रतिमा, पोस्टर ठेवण्यात आले होते. आजूबाजूला लाल रंगातील खतावणी, वह्या, कोऱ्या नोटा, नाणी मांडण्यात आली होती. रंगीत बोळक्यांमध्ये साळीच्या लाह्या, बत्ताशे ठेवण्यात आले होते. तसेच विविध फळांची आरास करण्यात आली होती. ‘घरातील पीडा बाहेर जावो आणि बाहेरची लक्ष्मी घरात येवो’ अशी प्रार्थना करीत घरोघरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करण्यात आले.
पूजेसाठी पारंपरिक कपडे परिधान केले होते. सर्वत्र ‘आनंदी आनंद गडे’ असेच वातावरण होते. पूजा आणि त्यानंतर आरती झाली... सर्वांनी लक्ष्मीचे दर्शन घेतले आई-वडिलांच्या पाया पडण्यात आले आणि सुरूझाली फटाक्यांची आतषबाजी... शहरवासीयांनी धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली.