लक्ष्मीपूजनाला ठेवलेले २ लाख गायब!
By Admin | Updated: November 3, 2016 01:34 IST2016-11-03T01:23:53+5:302016-11-03T01:34:45+5:30
औरंगाबाद : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवासमोर ठेवलेले दोन लाख रुपये मध्यरात्री चोरट्यांनी गायब केल्याची घटना रविवारी रात्री मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

लक्ष्मीपूजनाला ठेवलेले २ लाख गायब!
औरंगाबाद : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवासमोर ठेवलेले दोन लाख रुपये मध्यरात्री चोरट्यांनी गायब केल्याची घटना रविवारी रात्री मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर येथे घडली. या चोरीचे रहस्य उलगडण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
हनुमाननगर भागातील गल्ली नं. २ मध्ये सर्जेराव शंकरराव आटोळे राहतात. ते चालक म्हणून कार्यरत आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आटोळे यांच्या घरातही नेहमीप्रमाणे जय्यत तयारी करण्यात आली होती. जिकडे तिकडे फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. घराघरांत लक्ष्मीपूजन सुरू होते.
आटोळे कुटुंबियांनीही रात्री ७ वाजेच्या सुमारास लक्ष्मीपूजन केले. लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर आटोळे यांनी रोख दोन लाख रुपये, घरातील मौल्यवान दागिने ठेवले. विधीवत पूजा करण्यात आली. लक्ष्मी प्रसन्न व्हावी अशी प्रार्थना देवासमोर करण्यात आली. घरात अत्यंत उत्साही वातावरण होते. आटोळे कुटुंबियांनी रात्री जेवण केले. नेहमीप्रमाणे घरातील सर्व मंडळी झोपी गेली. पहाटे ४.३० वाजता अचानक सर्जेराव आटोळे यांना जाग आली. त्यांनी लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर ठेवलेल्या दोन लाख रुपयांची पाहणी केली. जागेवर २ लाख रुपये नसल्याचे निदर्शनास आले.
घरातील सर्व मंडळींना झोपेतून उठवून विचारले असता सर्वांनी सांगितले की, आम्ही पैशांना हात लावला नाही.
मध्यरात्री १२.३० ते १२.४५ दरम्यान आटोळे यांची मुलगी काही वेळेसाठी दार उघडे ठेवून बाथरूमला गेली होती. याच वेळेत चोरट्यांनी त्यांच्या घरातील रोख रकमेवर ताव मारला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक झिने करीत आहेत.
खाद्यपदार्थ खरेदीसाठी जाणे महागात पडले
खाद्यपदार्थ खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील रोख रक्कम व मोबाईल चोरी गेल्याची घटना रंगारगल्ली येथे घडली.
फिर्यादी अंकिता सोनी (रा. गुरुदत्त हौ. सोसायटी, शहानूरवाडी, दर्गारोड) यांनी रंगारगल्लीतील गायत्री चाट भंडारात कचोरी, समोसा विकत घेतला व पैसे काढून हँडपर्स पिशवीत ठेवली. दुकानदारांस पैसे देत असताना पायाजवळ ठेवलेल्या पिशवीतील पर्स चोरट्यांनी अलगद पळविली. त्यात रोख रक्कम व मोबाईल, असा एकूण १५ हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ. शेख हमीद करीत आहेत.
सातारा परिसरातील गट नं. ६८ येथे कंपनी व शेतीच्या जागेवर अतिक्रमण केले म्हणून सातारा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा गट नं. ६८ येथे अनिल सिकची (६६, रा. शिल्पनगर) यांच्या मालकीची शेती व कंपनीची जागा असून, आरोपी रवी दामोदर, आरेफ खान, वाघमारे पूर्ण नाव माहीत नाही. यांनी सदरील जमिनीवर सिमेंटचे पोल लावून अतिक्रमण करणे सुरू केले होते. सिकची यांना ही माहिती समजताच त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असता, कोणताही पुरावा त्यांना देता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी करून तक्रारीनुसार सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकॉ. शेषराव चव्हाण करीत आहेत.
नादाला लागू नको म्हणत एकास तीन जणांनी बेल्ट व चापटबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना विश्रांतीनगर चौकात सोमवारी रात्री घडली. फिर्यादी भरत राजपूत (३६, रा. विश्रांतीनगर, मुकुंदवाडी) घराजवळील चौकात आला असता, सोमवारी रात्री पाठीमागून रमेश व त्याचे दोन मित्र (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) आले. रिक्षा (एमएच-२० डीसी २७६९) त्यांनी विचारली की, माझ्या नादाला लागू नको, असे म्हणून जुने भांडण उकरून काढून रमेशने कंबरेचा बेल्ट काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. दुसऱ्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोक्यात बेल्टच्या कडीने मारल्याने डोक्याला जखम झाली. उजव्या डोळ्याजवळदेखील जखम झाली. आरोपींच्या ताब्यातून सुटका करून मुकुंदवाडी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या प्रकरणी पोहेकॉ. हिंगे अधिक तपास करीत आहेत.