मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख
By Admin | Updated: July 30, 2014 01:18 IST2014-07-30T01:15:32+5:302014-07-30T01:18:34+5:30
औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील ज्येष्ठ लेखक व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी
मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख
औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील ज्येष्ठ लेखक व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड करण्यात आली.
मसाप कार्यकारिणीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे संमेलन डिसेंबर २०१४ मध्ये उदगीर येथे होणार असून, त्याच्या तारखा संमेलनाचे स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके हे निश्चित करून लवकरच घोषित करतील. यावेळी कुंडलिक अतकरे, देवीदास कुलकर्णी, श्याम देशपांडे, भारत सासणे, प्रा. ललिता गादगे, डॉ. जगदीश कदम, रसिका देशमुख, प्रकाश त्रिभुवन, प्रा. भास्कर बडे, प्रा. विलास वैद्य आदींची उपस्थिती होती.
संमेलनाध्यक्षांचा अल्पपरिचय
1लक्ष्मीकांत देशमुख यांच्या ‘इन्किलाबविरुद्ध जिहाद’, ‘अंधेरनगरी’ आणि ‘आक्टोपस’ या तीन कादंबऱ्या, ‘सलोमी’ व ‘दौलत’ या दोन लघुकादंबऱ्या, ‘पाणी-पाणी’, ‘नंबर वन’, ‘आंतरीच्या गूढगर्भी’, ‘अग्निपथ’, ‘कथांजली’ आणि ‘ सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’ हे चार कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. आपल्या कादंबऱ्यातून वेगळे विषय हाताळले असून चटका लावणारे लेखन केले आहे. त्यांना महाराष्ट्र शासन, मसाप, महाराष्ट्र साहित्य परिषद व इतर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
2देशमुख यांनी महाराष्ट्र व भारतीय प्रशासन सेवेंतर्गत उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आदी पदांवर काम केले असून सध्या ते मुंबईत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
एकमुखी निवड
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड ही सतत वादाचा विषय ठरत असताना आज मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड एकमुखी व कोणताही वादविवाद न होता करण्यात आली.
विशेष म्हणजे ३५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी देशमुख यांचे नाव सुचविले व त्यावरच सर्वांनी शिक्कामोर्तब केले. अन्य कुणाचेही नाव समोर आले नाही.
गतवर्षीच्या संमेलनाचे अध्यक्ष सासणे हे प्रशासकीय अधिकारी होते व नियोजित संमेलनाचे अध्यक्षही योगायोगाने प्रशासकीय अधिकारी आहेत.