कर्मचाऱ्यांना ‘लक्ष्मी’ पावली !

By Admin | Updated: October 23, 2014 00:01 IST2014-10-23T00:01:28+5:302014-10-23T00:01:28+5:30

संजय कुलकर्णी , जालना नगरपालिका कर्मचाऱ्यांना ‘लक्ष्मी’ पावली असून दोन थकीत पगारांसह आॅक्टोबर महिन्याचा अ‍ॅडव्हान्स पगार तसेच अग्रीम राशीची रक्कमही अदा करण्यात येत आहे.

Laxmi! | कर्मचाऱ्यांना ‘लक्ष्मी’ पावली !

कर्मचाऱ्यांना ‘लक्ष्मी’ पावली !


संजय कुलकर्णी , जालना
नगरपालिका कर्मचाऱ्यांना ‘लक्ष्मी’ पावली असून दोन थकीत पगारांसह आॅक्टोबर महिन्याचा अ‍ॅडव्हान्स पगार तसेच अग्रीम राशीची रक्कमही अदा करण्यात येत आहे. त्यामुळे दसरा आणि बकरी ईद हे दोन सण आर्थिक अडचणीत काढणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.
जालना पालिकेत एकूण ८०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात ३५७ सफाई कामगारांचा समावेश आहे. आॅगस्ट २०१४ पासून पालिका कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नव्हते. अगोदरच कर्मचाऱ्यांचे नियमित वेतनही अनेकवेळा विलंबाने होते. मागील काळात शिक्षकांना त्यांच्या पगारासाठी अनेकदा आंदोलने करावी लागली होती. त्याचप्रमाणे नगरपालिका कर्मचाऱ्यांनीही यापूर्वी पगारासाठी आंदोलन केले होते.
आॅगस्ट व सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे वेतन अडकले. शासनाकडून वेतन अनुदानाची रक्कम न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना दसरा व बकरी ईद हा सण पगाराविनाच साजरा करावा लागला. अशा परिस्थितीत दिवाळीला तरी कर्मचाऱ्यांचे पगार होणार किंवा नाही, अशी शक्यता निर्माण झाली होती. काही कर्मचाऱ्यांनी उसनवारी, हॅन्ड लोण देखील घेतले होते.
नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे व उपनगराध्यक्ष शाह आलमखान यांनी याबाबत मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वी अदा करावा, अशी सूचना केली. काही तांत्रिक बाबींमुळे वेतन अदा करण्यात आले नव्हते. मात्र २२ आॅक्टोबर रोजी आॅगस्ट, सप्टेंबर यासह आॅक्टोबर महिन्याचे अ‍ॅडव्हान्स वेतन तसेच ५ हजार रुपयांची अग्रीम राशीही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मांगीरबाबा जत्रा काळात नगरपालिकेतील सफाई कामगारांना अग्रीम राशीची रक्कम देण्यात येते. तसेच मुस्लिम समाजातील कर्मचाऱ्यांना रमजान ईद काळात ही राशी देण्यात येते. दिवाळीनिमित्त हिंदू समाजातील कर्मचाऱ्यांना ही राशी दिली जाते. अग्रीम राशीची रक्कम नियमित पगारातून टप्प्याटप्प्याने कपात केली जाते. तीन महिन्यांचा पगार व अग्रीम राशी मिळाल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Laxmi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.