सैन्य दलाच्या रणगाड्याचे थाटात लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 00:51 IST2016-09-28T00:31:26+5:302016-09-28T00:51:54+5:30
औरंगाबाद : भारतीय सैन्य दलाच्या आर्टिलरी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी सकाळी रणगाड्याचे लोकार्पण थाटात करण्यात आले. नगर महामार्गावरील रेल्वे

सैन्य दलाच्या रणगाड्याचे थाटात लोकार्पण
औरंगाबाद : भारतीय सैन्य दलाच्या आर्टिलरी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी सकाळी रणगाड्याचे लोकार्पण थाटात करण्यात आले. नगर महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले असून, त्यावर हा ठेवण्यात आलेला रणगाडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
भारतीय सैन्य दलात यशाचा तुरा खोवणारा हा रणगाडा मराठवाड्यातील तरुणांना सैन्यदलाच्या माध्यमातून देशसेवा करण्याची प्रेरणा सतत देईल, या उद्देशाने तो चौकात ठेवण्यात आला आहे. शहरात प्रवेश करताना हा रणगाडा लक्ष वेधून घेत आहे.
महापालिका आणि छावणी परिषदेने महत्त्वाच्या चौकांमध्ये हे रणगाडे ठेवण्याच्या सूचना सैन्य दलाने केल्या होत्या. यातून चौक सुशोभीकरण तर होईलच. याशिवाय सैन्याचा मान, सैन्य दलाची परंपरा नागरिकांच्या कायम लक्षात राहील, हा उद्देश आहे. त्याचा एक भाग म्हणून पहिला रणगाडा छावणी परिषदेला देण्यात आला. त्याचे आज सकाळी खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
सैन्यात दलातून बाद झालेले रणगाडे चौकांमध्ये लोकांना पाहण्यासाठी ठेवावेत. ज्यामुळे सैन्यदलाविषयी समाजात जाणीव जागृती निर्माण व्हावी. युवकांना प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
देशसेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या मराठवाड्यातील शहिदांना हा रणगाडा समर्पित करण्यात आला आहे, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हवेत तिरंगी फुगे, कबुतर सोडण्यात आले.
यावेळी ९७ आर्टिलरी ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडिअर अनुराग वीज, आ. इम्तियाज जलील, आ. संजय शिरसाट, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, लोकमत समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा, महापौर त्र्यंबक तुपे, छावणी परिषदेचे उपाध्यक्ष रफत अली बेग, सीईओ विजय नायर, नगरसेवक किशोर कच्छवाह, अनिल जैस्वाल, करणसिंग काकस यांच्यासह कर्नल राजस साहा, कर्नल पीयूष बिष्ट, कर्नल रामेश्वर शर्मा, लेफ्टनंट कर्नल अमित सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता अरुंधती शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.