श्री योगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सवास प्रारंभ
By Admin | Updated: November 29, 2014 00:30 IST2014-11-29T00:05:47+5:302014-11-29T00:30:01+5:30
अंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत होत आहे.

श्री योगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सवास प्रारंभ
अंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत होत आहे. शुक्रवारी सकाळी वर्णी महापूजेने मार्गशीर्ष महोत्सवास प्रारंभ झाला. तहसीलदार राहुल पाटील व रेवती पाटील यांनी योगेश्वरी देवीची विधीवत महापूजा केली. या वर्णी महापूजेने या महोत्सवाची सुरूवात झाली
मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदीर परिसरात सलग नऊ दिवस आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. या वर्षी मंदिरात जवळपास ४ हजार महिला बसल्या असल्याची देवल कमिटीच्या वतीने देणयात आली. शुक्रवारी सकाळी झालेल्या महापूजेनंतर महिलांची मंदिरात आराध बसण्यासाठी गर्दी वाढू लागली होती. शहर वासियांनी योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा केल्या होत्या. या वेळी झालेल्या महापूजेला तहसीलदार राहुल पाटील व रेवती पाटील यांनी विधिवत योगेश्वरी देवीची महापूजा व महाआरती केली. यावेळी देवल कमिटीचे विश्वस्त भगवानराव शिंदे, मुकुंद पुजारी, सारंग पुजारी, यांच्यासह देवीचे मानकरी भक्त उपस्थित होते. पौरोहितांच्या विधीवत महापूजेनंतर महोत्सवास प्रारंभ झाला. महोत्सवाच्या कालावधीत सलग नऊ दिवस विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच आराध बसलेल्या सर्व महिलांच्या निवासाची, पाण्याची व त्यांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी देवल कमिटीच्या वतीने उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. अशी माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार राहुल पाटील यांनी दिली. (वार्ताहर)
भाविकांसाठी सार्वजनिक शौचलयाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख उषा यादव यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव हा अंबाजोगाईच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचा उत्सव आहे. यानिमित्ताने अंबाजोगाई शहर तालुक्यातून तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. महिला भाविकांची संख्या अधिक असते. मार्गशीर्ष नवरात्रानिमित्ताने महिला भाविक आराध बसण्यासाठी मंदिरात येतात. ९ दिवस महिला आराध म्हणून बसतात. ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचप्रमाणे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेण्यात यावी. मंदिर प्रशासनाने या प्रश्नात लक्ष घालावे व भक्तांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी उषा यादव, प्रशांत शिंदे, अर्जुन जाधव यांनी या निवेदनाव्दारे केली़