डाळ विक्री केंद्राचा शुभारंभ
By Admin | Updated: August 5, 2016 00:13 IST2016-08-04T23:59:36+5:302016-08-05T00:13:56+5:30
लातूर : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मार्केट यार्डात गुरुवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते दाळ विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला़

डाळ विक्री केंद्राचा शुभारंभ
लातूर : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मार्केट यार्डात गुरुवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते दाळ विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला़ या डाळ विक्री केंद्रातून तूर आणि मूगडाळ माफक दरात मिळणार आहे़
कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील यादव, जिल्हा उपनिबंधक बी़एल़ वांगे, उपविभागीय अधिकारी प्रताप काळे, तहसीलदार संजय वरकड, सहाय्यक पुरवठा अधिकारी झांपले, संचालक अॅड़ बळवंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी सभापती ललितभाई शहा म्हणाले, जिल्हा प्रशासनाने धान्यसाठ्याची मर्यादा वाढवून देण्याची गरज आहे़ तूर व मूगदाळीची मागणी ग्राहकांतून असते़ सर्वसामान्यांच्या आहारात या डाळीचा समावेश असतो़ त्यामुळे पुरवठा विभागाने या धान्याची मर्यादा वाढवून देणे आवश्यक आहे़ यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात ५ ग्राहकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते डाळीची विक्री करण्यात आली़ डाळ पुरवठाधारक रतन बिदादा यांचा सत्कारही करण्यात आला़
यावेळी बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, संभाजी वायाळ, विक्रम शिंदे, बालाप्रसाद बिदादा, तुकाराम आडे, तात्याराव केंद्रे, गोविंद नरहरे, हणमंत खंदाडे, हर्षवर्धन सवाई, बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर, बाजार समितीतील हमाल मापाडी संघटना, गाडीवान संघटनेसह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्यने उपस्थिती होती़
जिल्हाधिकारी पांडुरंग पोले म्हणाले, मानवाची झपाट्याने प्रगती होत आहे़ त्यानुसार मानवाचे जीवनमान उंचावत आहे़ तसेच त्यांच्या आहाराचे पौष्टिकत्व वाढत आहे़ त्यानुसार माणूस आपला आहार निश्चित करुन त्याचे सेवन करत आहे़ त्याचा विचार करता या पुढील काळात कडधान्याचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची गरज आहे़ परिणामी, कडधान्याचे भावही भविष्यात वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही़ या वाढीव भावावर जिल्हा प्रशासन सदैव लक्ष ठेवणार आहे़ भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना त्यांच्या मागणीनुसार डाळी मिळाव्यात म्हणून हे विक्री केंद्र उघडण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले़