‘अवकाळी’चा कहर सुरूचं
By Admin | Updated: April 14, 2015 00:43 IST2015-04-14T00:43:24+5:302015-04-14T00:43:24+5:30
उदगीर व देवणी तालुक्यात रविवारी रात्री धो-धो पाऊस बरसला़ दिवसा कडक उन्हं अनुभवल्यानंतर रात्री अनपेक्षितपणे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला

‘अवकाळी’चा कहर सुरूचं
उदगीर व देवणी तालुक्यात रविवारी रात्री धो-धो पाऊस बरसला़ दिवसा कडक उन्हं अनुभवल्यानंतर रात्री अनपेक्षितपणे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला नागरिक सामोरे गेले़ पावसातील वाऱ्यामुळे अनेकांची पत्रे उडाली़ तर आनंदवाडीत वीज पडून एक म्हैैस गतप्राण झाली़ सोमवारी दुपारी पुन्हा देवणी परिसराला पावसाने झोडपले़ वलांडी भागात तर लहान आकाराच्या गाराही पडल्या़
रविवारी रात्री तासभर वारे व रिमझिम कोसळल्यानंतर १० वाजण्याच्या सुमारास मात्र तुफान पाऊस सुरु झाला़ पावसात वारेही सुरु असल्याने अनेकांचे पत्रे उडाले़ दुकान, हॉटेल्ससमोरील निवारेही उडून गेले़ देवणी व परिसरात तब्बल सव्वा तासापेक्षा जास्त वेळ जोरदार पाऊस झाला़ रात्री ११़३० वाजण्याच्या सुमारास पावसाने उसंत घेतली़ या पावसामुळे नदी-नाल्यांतील डबक्यांमध्ये, रस्त्याशेजारी पाणी साचले आहे़
वलांडी : देवणी तालुक्यातील वलांडी परिसरात रविवारी रात्री जोरदार पाऊस झाला़ सोसाट्याचा वारा अन् चमकणाऱ्या विजांमुळे नागरिक भयभीत झाले होते़ रात्री सुरु झालेला पाऊस सलग तासभर पडला़ दरम्यान, सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पावसाने पुन्हा हजेरी लावली़ यावेळी लहान आकाराच्या गाराही बरसल्या़
हाळी हंडरगुळी : मागील चार-पाच दिवसांपासून हाळी हंडरगुळी परिसरात सातत्याने वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् अवकाळी पाऊस सुरु आहे़ नियमितपणे दुपारी चार वाजेनंतर वातावरणात बदल होऊन पाऊस सुरु होत आहे़ रविवारी मध्यरात्री बरसलेल्या पावसात वाऱ्यामुळे बाबा शेख, शिवशंकर गोरे यांच्यासह नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाली़ काही नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी घुसले़
निटूर : निटूर व परिसरात रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला़ या पावसामुळे आंब्याला लागलेल्या कैऱ्या पूर्णपणे गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला आंबा निघून गेल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे़ निटूर परिसरातील शेंद, मुगाव, मसलगा, ढोबळेवाडी, डांगेवाडी, उजेड, कलांडी, ताजपूर, बुजरुकवाडी, बसपूर, खडकउमरगा आदी गावांमध्ये आंब्यांची झाडे मोठ्या संख्येने आहेत़ रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे अंगद निटूरे, आत्माराम माळी, बाबुराव तत्तापूरे, पंकज कुलकर्णी आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)