धरपकड सुरू; १८ जण ताब्यात

By Admin | Updated: May 24, 2017 00:27 IST2017-05-24T00:24:35+5:302017-05-24T00:27:56+5:30

बीड : पोलिसांनी सोमवारी रात्रीच अटकसत्र राबवून १८ जणांना अटक केली आहे.

Launch 18 people to be held | धरपकड सुरू; १८ जण ताब्यात

धरपकड सुरू; १८ जण ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या विठ्ठल तिडकेवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी पुकारलेल्या जिल्हा बंददरम्यान हुल्लडबाजी व दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी तीन ठाण्यांत चार गुन्हे नोंद असून १४७ जणांना आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी सोमवारी रात्रीच अटकसत्र राबवून १८ जणांना अटक केली आहे.
सोमवारी शहरातून बंदचे आवाहन करणारी रॅली निघाली होती. यावेळी पोलिसांना हुलकावणी देत रॅलीतील काही कार्यकर्ते वेगवेगळ्या दिशेला गेले. त्यानंतर अंधाधूंद दगडफेक व हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. तोडफोड केल्याने लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची पोलिसांत नोंद आहे. आसेफनगरातील दगडफेकप्रकरणी शहर ठाण्यात किराणा व्यापारी अकबर खान पठाण यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात ३५ जणांवर गुन्हा नोंद झाला होता. दुकानाच्या काचा फुटल्याने ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यापैकी श्रीराम मस्के, विजय मोटे, रोहिदास भांबे, दीपक आमटे, विनोद इंगोले, महेश बागलाने, सचिन घोडके, संदीप पारडे, शुभम डाके यांना अटक केली आहे. पेठ बीड ठाण्याच्या हद्दीतील मोंढा भागात दगडफेक केल्याप्रकरणी १० ते १५ जणांवर गुन्हा नोंद असून त्यापैकी पाच जणांना जेरबंद केले आहे. गहिनीनाथ वाणी, रोहित गलधर, शुभम वीर, सिद्धांत वरपे, प्रमोद घोडके यांचा समावेश आहे. शिवाजीनगर ठाणे हद्दीत दगडफेक करुन खासगी मालमत्ता व वैद्यकीय सेवेचे ५५ हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी पोहेकॉ किसन सानप यांच्या फिर्यादीवरुन ७६ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे, मनविसे जिल्हाप्रमुख शैलेश जाधव, गणेश मोरे, योगेश शेळके, राहुल टेकाळे, दादासाहेब खिंडकर, धनंजय जगताप, महेश धांडे, माजी जि.प. उपाध्यक्ष गंगाधर घुमरे, नागेश मिठे, सचिन हावळे, हनुमंत कदम, गणेश जगताप, अमित काकडे, अशोक रोमण, स्वप्निल पिंगळे व इतर साठ जणांना आरोपी केले आहे.
यापैकी अमित काकडे, गणेश जगताप, संतोष कदम व अशोक बेद्रे यांना अटक केली आहे.
नाहक गोवल्याचा आरोप
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे, त्यांना नाहक गोवल्याचा आरोप होत आहे. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ या संदर्भात पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे.
पत्रकबाज पदाधिकारी चिडीचूप
बंदच्या पूर्वतयारीसाठी विविध पक्ष- संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषणे केली. काहींनी पत्रकांतून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले; परंतु बंददरम्यान झालेल्या दगडफेक व मारहाणीच्या घटनेनंतर काही पदाधिकारी रॅलीतून गायब झाले.

Web Title: Launch 18 people to be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.