देशव्यापी संपातून लातूरच्या सराफांची माघार
By Admin | Updated: April 25, 2016 23:32 IST2016-04-25T23:16:44+5:302016-04-25T23:32:14+5:30
लातूर : केंद्र सरकारच्या अबकारी कराविरोधात देशभरातील सराफा व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून पुन्हा बेमुदत बंदची हाक दिली आहे

देशव्यापी संपातून लातूरच्या सराफांची माघार
लातूर : केंद्र सरकारच्या अबकारी कराविरोधात देशभरातील सराफा व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून पुन्हा बेमुदत बंदची हाक दिली आहे. मात्र या संपात शहर व जिल्ह्यातील सराफा व्यापारी सहभागी होणार नाहीत, असा निर्णय व्यापाऱ्यांच्यावतीने घेण्यात आला आहे. अशी माहिती लातूर जिल्हा सराफा सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष मोहन जाधव-रामेगावकर यांनी दिली. तब्बल ४४ दिवसांच्या आंदोलनानंतर पुन्हा मंगळवारपासून देशव्यापी आंदोलन सुरु करण्यात येत आहे. आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असून, या प्रकरणी सोमवारी लातूर जिल्हा सराफा-सुवर्णकार असोसिएशनची बैठक घेण्यात आली.
केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित अबकारी कराविरोधात देशभरातील सराफा व्यापाऱ्यांनी पुन्हा मंगळवारपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये देशभरातील सराफा व्यापारी सहभागी होणार आहेत. मात्र या आंदोलनात लातूर शहरासह जिल्हाभरातील १२०० दुकानदार सहभागी होणार नसल्याचा निर्णय असोसिएशनच्या वतीने सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. या आंदोलनातून आम्ही माघार घेत असल्याचेही रामेगावकर यांनी सांगितले. तब्बल ४४ दिवस चाललेल्या आंदोलनात शेवटच्या टप्प्यात व्यापाऱ्यांत उभी फूट पडली होती. हा अनुभव लक्षात घेता, व्यापाऱ्यांनी सोमवारी तातडीची बैठक बोलाविली होती.
देशव्यापी संपात सहभागी व्हायचे असेल, तर एकजुटीने व्हावे अन्यथा संपातून माघार घ्यावी, असा विचार पुढे आला. संपातून माघार घेण्याबाबत एकमत झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. (प्रतिनिधी)