लातूरचा पारा ४३ अंशांवर
By Admin | Updated: May 20, 2015 00:19 IST2015-05-20T00:10:28+5:302015-05-20T00:19:40+5:30
लातूर : मागील तीन आठवड्यांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून, ४३ अंशांवर पारा गेला आहे. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता आहे

लातूरचा पारा ४३ अंशांवर
लातूर : मागील तीन आठवड्यांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून, ४३ अंशांवर पारा गेला आहे. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता आहे. उन्हाचे चटके इतके असह्य आहेत की, दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे मुश्किलीचेच आहे. त्यामुळे शहरातील रस्ते दुपारच्या सुमारास निर्मनुष्य होत आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. रस्त्यांवरील डांबर दुपारच्या सुमारास पगळत आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून कधी ४१ तर कधी ४२ अंशांपर्यंत तापमानाचा पारा जात आहे. औरादच्या हवामान केंद्रांवर मंगळवारी तापमानाची नोंद ४३ अंशांवर गेली होती. सूर्य आगच ओकतो आहे. डांबरी रस्ते दुपारच्या सुमारास पगळत आहेत. पंखे, कुलर आणि वातानुकूलित यंत्रांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी वापर वाढला आहे. मात्र या वस्तूही उन्हात बंद पडत आहेत. पंखे व कुलरची हवा या उन्हाच्या धगीपुढे फिकी पडत आहे. मे हिटमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, त्यामुळे रस्ते व बाजारपेठ दुपारच्या सुमारास निर्मनुष्य होत आहे. सायंकाळी ६ वाजेनंतरच बाजारात गर्दी होते. उन्हापासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात नागरिक वृक्षांचा आधार घेत आहेत, तर शहरातील नागरीक उद्यानांचा सहारा घेतात. परिणामी, ज्यूस सेंटर, आईस्क्रीम, रसवंतीगृहांत ग्राहकांची संख्या वाढली आहे. वाढत्या उन्हामुळे बालकांसह वृद्धांच्या शरीरातील पाणी कमी होत आहे. जास्त घाम आल्याने शरीरातील सोडीयम व पोटॅशियमचे प्रमाण कमी होत आहे. परिणामी, चक्कर येणे, अस्वस्थता जाणवणे, हाता-पायाला गोळे येणे, थकवा येणे, लहान मुलांच्या नाकातून रक्तस्त्राव होणे अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने ऊन लागलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड स्थापन केला असून, बाह्य रुग्णांची संख्याही वाढली आहे.
त्वचाद्वारे घाम येऊन शरीरातील पाण्याचे उत्सर्जन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे थकवा जाणवतो. शिवाय, त्वचारोगही उद्भवू शकतात. याला रोखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. त्यात लिंबाच्या रसाचा वापर करण्यास हरकत नाही, असे सर्वोपचार रुग्णालयातील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अजय ओव्हळ यांनी सांगितले.
उन्हामुळे मानवी शरीरातील पाणी कमी होते. घाम येण्याचे प्रमाण वाढते. अंग खाजणे, घामोळ्या येणे, त्वचा जळणे, अंगावर पुरळ येणे, ओलसरपणा राहून जंतूसंसर्ग होणे, नाक कोरडे पडणे, नाकातील छोट्या रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होणे आदी प्रकारच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले.