मनपासाठी लातूरच्या ईव्हीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:16 IST2017-09-17T00:16:17+5:302017-09-17T00:16:17+5:30
महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेसाठी जवळपास २ हजारांहून अधिक ईलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन (ईव्हीएम) लागणार आहेत. या मशीन लातूर आणि परभणीहून मागविण्यात आल्या आहेत.

मनपासाठी लातूरच्या ईव्हीएम
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेसाठी जवळपास २ हजारांहून अधिक ईलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन (ईव्हीएम) लागणार आहेत. या मशीन लातूर आणि परभणीहून मागविण्यात आल्या आहेत.
महापालिका निवडणूक प्रक्रियेत २० प्रभागांमध्ये ८१ वॉर्डासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शनिवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. राजकीय रणधुमाळीसह प्रशासकीय तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या प्रक्रियेसाठी २ हजार इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन लागणार आहेत. या मशीन नुकत्याच महापालिका निवडणुका झालेल्या लातूरमधून मागविण्यात येणार आहेत. त्यासह परभणी येथूनही ईव्हीएम मशीन घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत निर्देश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने २ हजार ईव्हीएम मशीन लातूर आणि परभणीतून प्राप्त केले आहेत. या ईव्हीएम मशीनची एफएलसी अर्थात फर्स्ट लेवल क्लिअरिंगची प्रक्रिया सुरू आहे.
यापूर्वी नांदेड जिल्हा प्रशासनाकडे ईव्हीएम मशीन होत्या. त्या आयोगाने परत मागवल्यानंतर पाठवण्यात आल्या आहेत. महापालिकेला ८०० कंट्रोल युनिट आणि २५०० बॅलेट युनिट प्राप्त झाले आहेत. एका मतदान केंद्रावर ४ बॅलेट युनिट आणि एक कंट्रोल युनिट लागणार आहे. मनपा निवडणुकीसाठी शहरात ५३६ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
दुसरीकडे व्हीव्हीपॅट मशिनच्या वापरासंदर्भातील अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. व्हीव्हीपॅटद्वारे मतदाराला मतदान केंद्रात आपण कोणाला मतदान केले हे व्हीव्हीपॅट मशीनवर समजणार होते.
मतदानाची स्लीप ही मतदान केंद्रातच एका वेगळ्या बॉक्समध्ये राहणार होती. या मशीनच्या वापरासंदर्भात शहरवासियांमध्ये उत्सुकता होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त एस. व्ही. सहारिया यांनी नांदेड महापालिकेत व्हीव्हीपॅटच्या वापरासंदर्भातील संदिग्धता कायम असल्याचे सांगितले. खुद्द राज्य निवडणूक आयुक्तांनीच मशीन वापराबाबत अनिश्चितता असल्याचे सांगितल्यामुळे आता या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.