लातूरची आश्लेषा फड ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’त !
By Admin | Updated: August 20, 2016 00:51 IST2016-08-20T00:42:37+5:302016-08-20T00:51:20+5:30
लातूर : लातूरसारख्या गावातून अभिनयाद्वारे करिअरची वेगळी वाट चोखाळणाऱ्या आश्लेषा फड या विद्यार्थिनीने बाराशेहून अधिक मुला-मुलींमधून अत्यंत

लातूरची आश्लेषा फड ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’त !
लातूर : लातूरसारख्या गावातून अभिनयाद्वारे करिअरची वेगळी वाट चोखाळणाऱ्या आश्लेषा फड या विद्यार्थिनीने बाराशेहून अधिक मुला-मुलींमधून अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’ ची पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रवेश मिळविला आहे. डॉक्टर आणि इंजिनिअर होण्यासाठी प्रवेश घेणाऱ्यांच्या भाऊगर्दीत तिच्या निवडलेल्या वाटेवर लातूरच्या सांस्कृतिक वर्तुळात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जिल्ह्यातून नॅशनल स्कूल आॅफ ड्रामात शिकणारी ती पहिलीच विद्यार्थी ठरली आहे.
आश्लेषा फड ही मूळची बीडची. मात्र तिच्या आई-वडिलांनी स्वत:चे करिअर आणि मुलांचे शिक्षण यासाठी लातुरात वास्तव्य केले. बीडच्या संस्कार विद्यालयातून गुरु सतीश साळुंके यांच्याकडून अभ्यासाबरोबर अभिनयाचाही संस्कार घेऊन लातुरात आलेली आश्लेषा देशी केंद्र विद्यालयात माध्यमिक तर उच्च माध्यमिकपर्यंत विज्ञान शाखेतून दयानंद महाविद्यालयात शिकली. तिच्यातल्या अभिनेत्रीला दयानंदने जिवंत ठेवले पण जाणिवा दिल्या त्या ‘नुपूर अकादमी’च्या नभा बडे यांनी. इथे तिने भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेऊन विशारद पूर्णत्वाला नेले. विज्ञान शाखेत असूनही आपल्यातील अभिनयाची ओढ मरु दिली नाहीच. शिवाय बारावी विज्ञानला चांगले गुण पडूनही अस्मिता फड या डॉक्टर आणि आणि परशुराम फड या केमिस्ट पित्याची ही मुलगी अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी पुण्याच्या ललित कला गुरुकुल केंद्रातून नाटकाची पदवी घेऊन बाहेर पडली. पण शिकण्याची ओढ संपली नाही. कोणत्याही नाट्य आणि सिने कलावंताला नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’त जाऊन नाटक शिकावे हे मनस्वी वाटतेच. तसेच तिला वाटले. देशभरातून दीड - दोन हजार विद्यार्थी प्रवेश पात्रता फेरीला होते. परंतु आश्लेषाने लेखीसह सादरीकरणाद्वारे प्रॅक्टीकलही उत्तम देऊन अंतिम २७ जणांत आपले स्थान पक्के केले. आता तीन वर्षांच्या तिच्या नाट्य शिक्षणाचा ३ लाख २० हजारांचा खर्च शासन करणार आहे. अंतिम निवड झालेल्या २७ मध्ये महाराष्ट्राच्या चार मुली आणि एक मुलगा असे पाचजण आहेत. मराठवाड्यातून आश्लेषा ही एकमेव आहे. लातूरमधून या संस्थेत प्रवेश मिळविणारी ती एकमेव ठरली आहे.