लातूरकरांना टंचाईच्या झळा

By Admin | Updated: July 19, 2014 00:41 IST2014-07-18T23:55:47+5:302014-07-19T00:41:28+5:30

लातूर : शहर महानगरपालिका हद्दीत पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत़

Laturakara scarcity shock | लातूरकरांना टंचाईच्या झळा

लातूरकरांना टंचाईच्या झळा

लातूर : शहर महानगरपालिका हद्दीत पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत़ १५ दिवसातून एकवेळा नळाला मिळणारे पाणी अपुरे मिळत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत़ पाणी साठवणुकीसाठी काहीजणांकडे अपुरे साहित्य असल्याने गैैरसोय होत आहे़ शिवाय, जास्त दिवस साठवलेल्या पाण्याचा वास येत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ लातूर शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़
गेल्या दोन वर्षांपासून लातूरकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने गेल्यावर्षी पावसाळ्यातही लातूरकरांना आठ दिवसाआड पाणी मिळत होते़ यावर्षी तर गतवर्षीपेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे़ उन्हाळ्यात आठ दिवसांनी नळाला पाणी येत होते़ पावसाळा सुरू झाल्यापासून लातूरचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे़ मांजरा धरणातून सुरु असलेला पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने नागझरी बॅरेजेसमधून पाणी उपसा सुरु करण्यात आला़ मात्र दोन्ही प्रकल्पांत अत्यल्प पाणी असल्याने पाणी वाटपावर काही निर्बंध घालण्यात आले़ प्रकल्पातच पाणी नसल्याने लातूरकरांची पाण्यासाठी भटकंती दिवसेंदिवस वाढतच गेली़
मनपाच्या सार्वजनिक विंधन विहिरी व हातपंपानेही तळ गाठल्याने जलसंकट गंभीर झाले़ त्यातच नागरिकांचा पाण्यासाठी रोष वाढत असल्याचे लक्षात येताच महानगरपालिकेने प्रारंभी आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला होता़ नागरिकांची मागणी ज्याप्रमाणे वाढत गेली़ त्याप्रमाणे टँकरची संख्या वाढविण्यात आली आहे़ सध्या लातूर महानगरपालिकेचे २ व खाजगी १६ टँकर्सद्वारे शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा करण्यात येत आहे़
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा गेल्या वर्षभरापासून विस्कळीत झाला आहे़ नळाला पाणी येत नसल्याची ओरड नळधारकांतून वाढत चालली आहे़ एखाद्या भागात पाणी सोडले की, कधीकधी आठ-आठ तास पाणी एकाच भागात सुरु असते़
एकीकडे पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण असताना दुसरीकडे मात्र मोटारी लावून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केली जाते़ ही परिस्थिती मनपा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या प्रशासनाला लक्षात येऊनही यावर उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे लाखो लिटर्स पाणी वाया जाते़ सध्या नळाला पंधरा ते अठरा दिवसांनी पाणी येत आहे़ नळाला येत असलेले पाणी अपुरे मिळत आहे, अशी नागरिकांतून ओरड वाढत चालली आहे़
गाव भागात काही ठिकाणी विंधन विहिरींचा आधार उरला आहे़
शहरालगत नव्याने वसलेल्या वसाहतीत तीव्र पाणीटंचाई वाढलेली आहे़ तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे़
१८ टँकरद्वारे सुरू आहे शहरात पाणी पुरवठा़़़
महानगरपालिकेच्या वतीने शहरात पाणीटंचाई वाढल्याने १८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ गेल्या आठवड्यात मागणी वाढल्याने ४ टँकरची संख्या वाढविण्यात आली आहे़ ज्या भागातून मागणी येईल, अशा ठिकाणी टँकर पाठविले जात आहे़ आठवडाभरात झालेल्या पावसामुळे टंचाईची ओरड कमी झाली आहे़ शिवाय, मांजरा प्रकल्पातही किंचीत वाढ झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी पोहचविण्यात येत आहे़
शहरालगतच्या वसाहती तहानलेल्या़़़़
लातूर शहरातील गांधी नगर, कॉईल नगर, उस्मानपुरा, बरकत नगर, सम्राट चौक, काजी मोहल्ला, अंजली नगर, बुऱ्हाण नगर, खाडगाव रोड, बौध्द नगर, तावरजा कॉलनी आदी भागांत पाणीटंचाईच्या झळा वाढल्या आहेत़ शिवाय, शहरालगत वसलेल्या बार्शी रोडवरील राजे शिवाजीनगर, वसवाडी, अंबाजोगाई रोडवरील पठाण नगर, जाफर नगर, नांदेड रोडवरील नवीन वसाहतींमध्ये पाण्याची तीव्र टंचाई वाढली आहे़
पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा वाढल्याने लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे़ मांजरा धरणात यावर्षी पावसाळ्यात पाणीसाठा न वाढल्यास लातूरकरांना पुढच्या वर्षीही पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने सध्या पाण्यासाठी टँकरवर नागरिकांची गर्दी होत आहे़

Web Title: Laturakara scarcity shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.