राज्य मंडळ पथकांकडून लातूर विभागीय मंडळाची झाडाझडती
By Admin | Updated: May 22, 2015 00:32 IST2015-05-22T00:19:20+5:302015-05-22T00:32:46+5:30
भालचंद्र येडवे , लातूर मंडळ कामकाजात एकसुत्रीपणा यावा, कार्यप्रणाली सोपी व्हावी व अनावश्यक खर्च टाळता यावा हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्यमंडळ पथकाने तब्बल

राज्य मंडळ पथकांकडून लातूर विभागीय मंडळाची झाडाझडती
भालचंद्र येडवे , लातूर
मंडळ कामकाजात एकसुत्रीपणा यावा, कार्यप्रणाली सोपी व्हावी व अनावश्यक खर्च टाळता यावा हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्यमंडळ पथकाने तब्बल तीन दिवस लातूर विभागीय मंडळाची झाडाझडती केली़ लातूरचा बोर्ड कामकाजाचा श्रीगणेशा करुन आता हे पथक राज्यभर फिरणार आहे़
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत असलेल्या राज्यातील विविध विभागीय मंडळांच्या कार्यप्रणालीवर उलटसुलट चर्चा सुरु होती़ शिवाय मंडळाच्या खर्चावर नियंत्रण ठेवून कामकाजात एकसुत्रीपणा आणण्यासाठी ओरड सुरु होती़ राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधरराव ममाने यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेत, त्यांच्यासह राज्य मंडळाच्या सात कर्मचाऱ्यांचे पथक मुक्रर केले़ राज्यातील सर्व विभागीय मंडळाच्या कामकाजात सुधारणा, खर्चावर नियंत्रण, मंडळाचा फायदा व कार्यप्रणाली सोपी करण्यासाठी हे पथक राज्यातील नऊ विभागीय मंडळ कार्यालयात प्रत्यक्ष जावून तपासणी करणार आहे़
राज्य मंडळाच्या पथकाने गेल्या तीन दिवसांपासून लातूर विभागीय मंडळाच्या कामकाजाची तपासणी केली़ बुधवारी दस्तुरखुद्द राज्यमंडळाचे अध्यक्ष गंगाधरराव ममाणे हे लातुरात येऊन येथील मंडळ कामकाजाचा आढावा घेतला़ लातूर विभागीय मंडळात जरी मोठ्या प्रमाणात त्रुट्या नसल्या तरी पुढच्या दौऱ्यापर्यंत या ठिकाणी झालेल्या चुका व कामकाजात एकसुत्रीपणा यावा, यासाठी सर्व विभागप्रमुखांना सूचना केल्या़ विशेष करुन अस्थापना, लेखा व भांडार या तीन विभागावर मंडळ अध्यक्षांनी करडी नजर ठेवत संबंधीतांना योग्य त्या सूचना दिल्या़ आता हे पथक संपूर्ण राज्यभरातील विभागीय मंडळांना भेटी देवून तेथील कामकाजाची तपासणी करणार आहे़
शेवटी सर्व विभागीय मंडळांकडून प्राप्त झालेल्या सुचनांचा गोषवारा तयार करुन राज्यातील सर्व विभागीय मंडळाच्या कामकाजात एकसुत्रीपणा आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे़ राज्यमंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे एकीकडे कौतुक होत असताना, दुसरीकडे अनेकांच्या छातीत धडधडी भरली आहे़