जलयुक्त शिवार अभियानाचा लातूर पॅटर्न
By Admin | Updated: May 21, 2015 00:30 IST2015-05-21T00:23:01+5:302015-05-21T00:30:15+5:30
हणमंत गायकवाड , लातूर शाश्वत शेती व पिण्याच्या पाण्यासाठी लातूर जिल्ह्यातील २०२ गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून, आतापर्यंत दोनशे कि.मी. अंतराचे नाला खोलीकरण व रुंदीकरण झाले आहे.

जलयुक्त शिवार अभियानाचा लातूर पॅटर्न
हणमंत गायकवाड , लातूर
शाश्वत शेती व पिण्याच्या पाण्यासाठी लातूर जिल्ह्यातील २०२ गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून, आतापर्यंत दोनशे कि.मी. अंतराचे नाला खोलीकरण व रुंदीकरण झाले आहे. २२४६ कामांपैकी १५०६ कामे पूर्ण झाली असून, दर आठवड्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कामाचा आढावा घेतल्याने आणि प्रत्यक्ष कामावर भेटी दिल्याने महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियानाचा ‘लातूर पॅटर्न’ निर्माण होत आहे. शासकीय यंत्रसामुग्री व विविध विभागांचा निधी, लोकप्रतिनिधींची भरघोस मदत आणि जनतेचा पाठिंबा मिळत असल्याने जलयुक्त शिवार अभियानाने गती घेतली आहे.
जिल्ह्यातील २०२ गावांत शिवार फेरी, काम कृती आराखडा, ग्रामसभा झाल्या असून, प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाल्यानंतर अगदी तीन महिन्यांमध्ये २२४६ कामांपैकी १५०६ कामे पूर्ण झाली आहेत. मे अखेर ७५६ कामे पूर्ण केली जाणार आहेत. या सर्व कामांचा आढावा दर आठवड्याला सोमवारी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घेतला जातो. स्वत: जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी बहुतांश गावांतील कामांची पाहणी केली आहे. १११ प्रकल्पांतील ५१ लाख ७४ हजार ८३५ घनमीटर गाळ लोकसहभागातून उपसला असून, शासकीय यंत्रणेद्वारे ३ लाख ३३ हजार ८९ घनमीटर नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले आहे. नाला बल्डींग २६, माती नाला बांध ४, सिमेंट बंधारे २, विहिरींचे पुनर्भरण ४६, ठिबक सिंचन १४०० असे एकूण १५०६ कामे पूर्ण झाली आहेत. यांत्रिकी विभागाच्या वतीने ६० कामे पूर्ण झाली आहेत. यातील बहुतांश कामाला जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी भेट दिली आहे. नवीन साखळी सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर, साठवण तलावाचे खोलीकरण आदी कामांचा यात समावेश आहे.
शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला जनता, संस्था, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे. या अभियानासाठी लोकांचा सहभाग वाढविण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
४लघुसिंचन विभागामार्फत सरळीकरण व खोलीकरण कामासाठी लोकसहभागातून १२९.५४ लाखांचा निधी मिळाला आहे. लोकप्रतिनिधींनीही भरघोस निधी या अभियानासाठी दिला आहे. खासदार संभाजी काकडे यांनी १ कोटीचा निधी लातूरच्या जलयुक्त शिवार अभियानाला दिला आहे.
४निलंगा (३० लाख), औसा (५६), लातूर शहर (१२), लातूर ग्रामीण (५), उदगीर विधानसभा (१० लाख) मतदारसंघातील आमदारांनी तसेच जिल्ह्याच्या खासदारांनी ६९ लाखांचा निधी जलयुक्त शिवारासाठी दिल्याने कामांना वेग आला आहे.
२६ जानेवारीला जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या १४३ कामांचा एकाच दिवशी एकाचवेळी शुभारंभ करण्यात आला. ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. काही पूर्णही झाली आहेत. कृषी विभागाचे ७८, लघुसिंचनची १५ आणि जिल्हा परिषदेची ५० अशा एकूण १४३ कामांचे भूमिपूजन २६ जानेवारीला झाले होते. ही सर्व कामे आता शेवटच्या टप्प्यात आहेत. मे एण्डपर्यंत कामे पूर्ण होणार आहेत. त्याचा दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जात आहे.