लातूरला कृत्रिम पावसाची गरज
By Admin | Updated: July 14, 2016 01:10 IST2016-07-14T00:39:18+5:302016-07-14T01:10:25+5:30
गतवर्षी मराठवाड्यात कमी पाऊस झाला़ यंदा मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस आहे़ गेल्या आठ दिवसात राज्यात सर्वत्र पाऊस झाला़

लातूरला कृत्रिम पावसाची गरज
गतवर्षी मराठवाड्यात कमी पाऊस झाला़ यंदा मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस आहे़ गेल्या आठ दिवसात राज्यात सर्वत्र पाऊस झाला़ परंतू, लातूर जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली़ बालाघाटचा पठार असलेल्या भागात वरूणराजा रूसलेला आहे़ शासनाने तरी लातूर जिल्ह्याकडे पाहून कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज आहे़ आकाशात ढग थांबलेले आहेत़ ते पुढे सरकण्याआधीच जर फ्लोराईडचा मारा करून कृत्रिम पाऊस पाडला तर लातूरकरांना दिलासा मिळेल, अशा प्रतिक्रिया लातूरकरांनी व्यक्त केल्या आहेत़ लातूर शहरात सध्याही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे़ तुटपुंज्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत़ परंतू, असाच पाऊस राहिला तर पेरलेले पीक हाती लागेल की नाही, याची चिंता आहे़ तीन वर्षांपासून लातूरकरांचे पाण्यासाठी हाल आहेत़ त्यामुळे शासनाने लातूर जिल्ह्यापुरता कृत्रिम पावसाचा प्रयोग हाती घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे़ ४
लातूर जिल्ह्यात ढग झाकाळून येतात़ मोठा पाऊस येईल, असे वाटत असतानाच ढग निघून जातात़ यामुळे शेतकरी व लातूर जिल्ह्यातील जनता चिंताग्रस्त आहे़ मराठवाड्यात कायमस्वरूपी कृत्रिम पावसाची यंत्रणा उभा केली पाहिजे़़ ज्यावेळी ढग दाटून येतील त्यावेळी फ्लोराईडचा मारा करून पाऊस पाडला पाहिजे़ शासनाने आता वाट न पाहता तत्काळ हा प्रयोग मराठवाड्यात राबवावा़ त्यासाठी नूतन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ नेऊन मागणी करणार असल्याचे भाजपाचे सुधीर धुत्तेकर म्हणाले़
वातावरण आहे तोपर्यंत शासनाने कृत्रिम पावसाचा निर्णय घ्यायला हवा़ गतवर्षी कृत्रिम पावसाला पोषक असलेले वातावरण निघून गेल्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्याचा फायदा झाला नाही़ त्यामुळे मागचा पूर्वानुभव लक्षात घेता आता शासनाने कृत्रिम पावसाची तयारी करावी़ जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल़ लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जर हा प्रयोग केला तर फायद्याचे होईल़ त्यासाठी शासनाने तत्काळ निर्णय घेण्याची गरज आहे़ तहानलेल्या लातूरकरांसाठी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, असे मत अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे यांनी व्यक्त केले़
बालाघाटच्या पठारात पाऊस कमी आहे़ तो नेहमीच कमी असतो़ कृत्रिम पाऊस पाडला तर थोडा फायदा होईल़ कारण आपल्याकडे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी नाही़ शिवाय, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ढग स्थिरावले पाहिजेत़ ते जर पुढे सरकले तर त्याचा फायदा होत नाही़ सध्याचे वातावरण कृत्रिम पावसाला पोषक असल्याचे अभ्यासक प्रा़डॉ़ सुरेश फुले म्हणाले़ या वातावरणाचा उपयोग शासनाने करून घेतला पाहिजे़