लातूर मनपातील पदाधिकाऱ्यांत कुरघोडीचे राजकारण !
By Admin | Updated: November 9, 2016 01:00 IST2016-11-09T01:03:00+5:302016-11-09T01:00:35+5:30
लातूर ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेसमधील मनपाच्या पदाधिकाऱ्यांत कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे.

लातूर मनपातील पदाधिकाऱ्यांत कुरघोडीचे राजकारण !
हणमंत गायकवाड लातूर
ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी काँग्रेसमधील मनपाच्या पदाधिकाऱ्यांत कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे. विशेष करून महापौर, उपमहापौर आणि स्थायीच्या सभापतींत राजकीय द्वंद्व आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारी आला. महापौर त्यांच्या दालनात उपस्थित असताना इकडे मात्र उपमहापौरांच्या दालनात चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ड्रेस व साडी-चोळी वाटपाच्या कार्यक्रमाचे नियोजन सुरू होते. ही बाब महापौरांना समजताच त्यांनी थेट आयुक्तांचे दालन गाठून ‘हा कार्यक्रम झाला तर राजीनामा देईन’, असे आयुक्तांना सुनावले. परिणामी, ड्रेस वाटपाच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली.
दीड महिन्यापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सफाई कामगारांना साडी-चोळी व ड्रेस वाटप करण्याचा निर्णय झाला होता. कपडे खरेदीसाठी उपमहापौर चाँदपाशा घावटी यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रकांत चिकटे, सुरेश पवार यांची समिती स्थापन करण्यात आली होती. रंगसंगतीवर अभ्यास करून समितीमार्फत साडी-चोळी व ड्रेस खरेदी करण्यात आले आहेत. दिवाळीत ड्रेस वाटप करण्याचे ठरले होते. त्यानुसार मंगळवारी उपमहापौरांच्या दालनात ड्रेस वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रातिनिधिक स्वरुपात ११ कर्मचाऱ्यांंना ड्रेस व साडी-चोळी वाटपाचे नियोजन होते. यावेळी स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे उपस्थित होते. प्रभाग समितीचे सभापती, नगरसेवकांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण मनपातून देण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण महापौर अॅड. दीपक सूळ यांना नव्हते. सकाळी महापौर अॅड. सूळ मनपात आल्यानंतर त्यांना ड्रेस वाटपाच्या कार्यक्रमाची कुणकुण लागली. त्यांनी थेट आयुक्तांचे दालन गाठून ‘हा कार्यक्रम मनपाचा आहे का? असेल तर तो प्रोटोकॉलनुसार आहे का?’ असा सवाल केला. या नाराजीमुळे अखेर उपमहापौरांच्या दालनातील ड्रेस वाटपाचा कार्यक्रम रद्द करून झोनमध्ये करण्याचा निर्णय झाल्याचे समजते. संबंधित झोनच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अधिकारात ड्रेस व साडी-चोळीचे वाटप करण्याचे ठरले असल्याचे समजते. महापौर, उपमहापौर, स्थायीचे सभापती व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झोननिहाय कार्यक्रम घेऊन सफाई कामगारांना या ड्रेसचे वाटप केले जाणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, उपमहापौर ड्रेस वाटपाच्या या कार्यक्रमाला दुजोरा देत नसले तरी प्रभाग समितीच्या सभापती केशरबाई महापुरे, शिवसेनेच्या नगरसेविका सुनीता चाळक, चंद्रकांत चिकटे यांनी ड्रेस वाटपाच्या कार्यक्रमासाठी मनपाचे निमंत्रण असल्याचे सांगितले. एकंदर, काँग्रेसच्या मनपातील सत्ताधाऱ्यांत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.