जन्म-मृत्यू प्रमाणपत्रात लातूर मनपा राज्यात अव्वल

By Admin | Updated: July 17, 2014 01:34 IST2014-07-17T01:09:40+5:302014-07-17T01:34:48+5:30

लातूर : जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र अवघ्या ४८ तासांत देण्याचा दिशादर्शक उपक्रम लातूर महानगरपालिकेने सुरू केला असून, कमी कालावधीत अधिक प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत.

Latur is the highest in the state of birth and death certificate | जन्म-मृत्यू प्रमाणपत्रात लातूर मनपा राज्यात अव्वल

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रात लातूर मनपा राज्यात अव्वल

लातूर : जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र अवघ्या ४८ तासांत देण्याचा दिशादर्शक उपक्रम लातूर महानगरपालिकेने सुरू केला असून, कमी कालावधीत अधिक प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत. या उपक्रमात लातूर मनपा राज्यात पहिल्या क्रमांकावर आली असल्याचा दावा मनपा अधिकाऱ्यांनी केला आहे.
या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहणाऱ्या लातूर महानगरपालिकेला स्थापनेपासूनच समस्यांचे ग्रहण लागले आहेत़ त्यातही बागेत तुळस यावी, अशा दृष्टीने मनपातील जन्म-मृत्यू विभागाने आपल्या कामकाजात गती दिली आहे़
लातूर महानगरपालिकेतील जन्म-मृत्यू विभागात अवघ्या ४८ तासांत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा उपक्रम जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आला असून, राज्यात या उपक्रमाची दखल घेण्यात आली असल्याचे निबंधक प्रकाश आदमाने यांनी सांगितले. महापौर स्मिता खानापुरे व मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू असून, कार्यालयप्रमुख प्रकाश आदमाने यांच्या सूचनेनुसार विजयकुमार शेटे, दत्ता सोनवणे, छाया आखाडे, सतीश कांबळे हे कर्मचारी कार्यरत आहेत. १ जानेवारी २०१४ पासून आतापर्यंत १३४५२ जन्म प्रमाणपत्र वितरित करण्यात आले, तर २२३५ मृत्यू प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले आहे.
लातूर शहरात ३५० रुग्णालये असून, लेबर कॉलनीतील शासकीय प्रसुतीगृहात दिवसाकाठी सुमारे ७५ बाळांचा जन्म होतो. या सर्वच हॉस्पिटलची माहिती दररोज संकलित करण्याचे काम या विभागामार्फत होते. (प्रतिनिधी)
शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी जून-जुलै महिन्यात सर्वाधिक दाखले देण्यात आले असल्याचे लातूर मनपाचे प्रकाश आदमाने यांनी सांगितले. अवघ्या चार कर्मचाऱ्यांवर येथील कामकाज सुरू आहे. सोलापूर येथे २२, नांदेड येथे १८ तर परभणीला १२ कर्मचारी जन्म-मृत्यू विभागात कामकाज करतात. अवघ्या चार कर्मचाऱ्यांवर राज्यात अव्वल क्रमांक पटकाविल्याचा दावा त्यांनी केला.

Web Title: Latur is the highest in the state of birth and death certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.