आंदोलकांवर सौम्य लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:57 IST2017-07-29T00:57:48+5:302017-07-29T00:57:48+5:30

माजलगाव : रस्त्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावरील तालखेड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.

Lathi charge on protestors | आंदोलकांवर सौम्य लाठीमार

आंदोलकांवर सौम्य लाठीमार

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : रस्त्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावरील तालखेड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकर्त्यांनी केला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तालुक्यातील तालखेड ते इरला हा १६ कि.मी. अंतर असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वारंवार मागणी करूनही तो दुरूस्त झाला नाही. लोकप्रतिनिधींकडून टाळाटाळ तर प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जात आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर बनत गेला. त्यामुळे हाल होत आहेत. माजलगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अंतर्गत तालखेड ते इरला मजरा हा रस्ता येतो. परंतु हा रस्ता गेवराई मतदार संघातील असल्यामुळे सा.बां. उपविभाग माजलगाव या बाबत सदरील रस्ता हा गेवराई विभागाकडे वर्ग केला असल्याचे सांगते.
गेवराई सा.बां. उपविभागाकडे रस्त्याबाबत विचारल्यास ते सदरील रस्ता हा आमच्याकडे अजून वर्ग झाला नसल्याचे कारण सांगतात. त्यामुळे या रस्त्याबाबत नेमका कोणाला जाब विचारावा असा संभ्रम झाला होता.
राजकीय पुढारी देखील या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देत नाहीत. कारण तालखेड परिसर हा माजलगाव तालुक्यात येतो तर मतदानासाठी गेवराई मतदार संघात येतो. रस्ता खराब झाल्यामुळे विशेष करून विद्यार्थ्यांचे त्यातही मुलींचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या रस्त्यावरून वाहन चालविणे तर दुरच परंतु पायी चालणेही मुश्किल बनते. त्यामुळे हा रस्ता दुरूस्त करण्यासाठी तालखेड, खेर्डा, एकदरा, इरला, थेरला, डुबा, तेलगाव, पुंगणी, जामगाव तांडा, येळा तांडा, चाहुर तांडा, वाडी, मारफळा तांडा इ. गावांचे ग्रामस्थ एकत्र आले व रास्ता रोको केला.
प्रशासनाकडुन आंदोलनाची बराचवेळ दखल न घेतल्यामुळे आंदोलन लांबले. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
दरम्यान, तहसीलदार एन.जी.झंपलवाड यांना निवेदन सादर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तीन तासानंतर महामार्गावरील वाहतुक सुरळीत झाली. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त होता.

Web Title: Lathi charge on protestors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.