अखेर शिवसेना-भाजपने पाळला जुन्या मैत्रीचा धर्म
By Admin | Updated: October 2, 2014 00:35 IST2014-10-02T00:16:16+5:302014-10-02T00:35:55+5:30
जालना : सहा दिवसांपूर्वीच विधानसभेच्या जागा वाटपावरून दुभंगलेली शिवसेना-भाजपा युती व काँग्रेस-राष्ट्रवादी

अखेर शिवसेना-भाजपने पाळला जुन्या मैत्रीचा धर्म
जालना : सहा दिवसांपूर्वीच विधानसभेच्या जागा वाटपावरून दुभंगलेली शिवसेना-भाजपा युती व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी बुधवारी झालेल्या येथील जिल्हा परिषदेत सभापती पदाच्या निवडणुकीने मात्र कायम राहिली. बहुमताच्या जोरावर सहा विषय समित्यांची चारही सभापती पदे युतीच्या ताब्यात गेली. नूतन सभापतींमध्ये ए.जे. बोराडे, लिलाबाई लोखंडे, मीनाक्षी कदम आणि शहाजी राक्षे यांचा समावेश आहे.
सेना-भाजपाची युती या निवडणुकीत होणार किंवा नाही, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. सभापती पदाच्या पूर्वसंध्येलाही युतीसंदर्भात या दोन्ही पक्षांची बैठक न झाल्याने आज सकाळपर्यंत सभापती पदासाठी इच्छूक सदस्यांमधील संभ्रम कायम होता. मात्र सकाळी युतीसंदर्भात तसेच उमेदवारीसंदर्भातही सेना-भाजपाची बैठक झाली. त्यात युतीचा निर्णय घेण्यात येऊन उमेदवार निश्चित करण्यात आले.
दुपारी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा घेण्यात आली.
यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड तर त्यांचे सहाय्यक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, रवि कांबळे, वाघचौरे हे उपस्थित होते. सभागृहात एकूण ५५ पैकी ५२ सदस्य हजर होते. यामध्ये युतीचे ३१ व त्यांना पाठिंबा देणारे ३ अपक्ष असे एकूण ३४ तर आघाडीचे १८ सदस्य हजर होते. त्यामुळे चारही सभापती पदाचे युतीचे उमेदवार ३४ विरुद्ध १८ अशा मतांच्या फरकाने विजयी झाले.
समाजकल्याण विषय समितीच्या सभापती पदासाठी भाजपाचे शहाजी दगडूबा राक्षे व राष्ट्रवादीचे भाऊसाहेब बाबाराव सोनवणे, सिंधूबाई वामन दांडगे व तात्याराव संपत रगडे या चार जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दांडगे व रगडे यांनी माघार घेतली. त्यामुळे राक्षे व सोनवणे यांच्यात सरळ लढत होऊन राक्षे विजयी झाले.
महिला व बालकल्याण विषय समितीसाठी सेनेच्या मिनाक्षी गणेश कदम व राकाँच्या रुख्मीणी रमेश सपकाळ यांच्यात लढत होऊन कदम विजयी झाल्या.
तर उर्वरीत प्रत्येकी दोन अशा चार विषय समित्यांसाठी भाजपाच्या लिलाबाई रामराव लोखंडे, सेनेचे आसाराम जिजाभाऊ बोराडे, राकाँचे सतीश दिगंबरराव टोपे, सुशिला दत्तात्रय वाघ व काँग्रेसचे राजेश धोंडिराम राठोड यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सतीश टोपे यांनी माघार घेतली. त्यामुळे लोखंडे व बोराडे यांचा विजय झाला. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेत राकाँ-काँग्रेस आघाडीचे पक्षीय बलाबल २१ एवढे आहे. त्यात मनसेचे रवि राऊत यांचा आघाडीला पाठिंबा आहे. मात्र राऊत हे यापूर्वी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच आज सभापती पदाच्या निवडणुकीलाही गैरहजर होते. तर काँग्रेसच्या तीन व काँग्रेस प्रणित एक अशा चार सदस्यांपैकी एल.के. दळवी व नरसिंग राठोड हे गैरहजर होते. विशेष म्हणजे दळवी हे दुपारी सभागृहात आले होते. परंतु ऐन निवडणूक प्रक्रियेवेळी ते सभागृहात नव्हते.