यात्रेकरूंचा शेवटचा जथा मंगळवारी रवाना
By Admin | Updated: September 17, 2014 01:15 IST2014-09-17T00:32:58+5:302014-09-17T01:15:07+5:30
औरंगाबाद : पवित्र हज यात्रेसाठी मराठवाड्यातील २३३० यात्रेकरू रवाना झाले. मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजता २३३ यात्रेकरूंना घेऊन शेवटचे विमान जेद्दाहकडे रवाना झाले.

यात्रेकरूंचा शेवटचा जथा मंगळवारी रवाना
औरंगाबाद : पवित्र हज यात्रेसाठी मराठवाड्यातील २३३० यात्रेकरू रवाना झाले. मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजता २३३ यात्रेकरूंना घेऊन शेवटचे विमान जेद्दाहकडे रवाना झाले. यात्रेकरूंच्या परतीचा प्रवास १९ आॅक्टोबरपासून सुरू होणार
आहे.
मराठवाड्यातील हज यात्रेकरूंचा प्रवास ७ सप्टेंबरपासून सुरू झाला. दररोज २३३ यात्रेकरू एका विमानाद्वारे जात होते. मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातील यात्रेकरू रवाना झाले. विभागातील सर्व यात्रेकरूंना थांबण्यासाठी ऐतिहासिक जामा मशीद येथे व्यवस्था करण्यात आली होती.
यात्रेकरूंना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी स्वयंसेवक आणि मरकज- ए- हुजाज कमिटीकडून घेण्यात येत होती. यात्रेकरूंच्या सर्व कागदपत्रांची तपासणी, सामानाची तपासणी, चलन बदलणे, ‘अहराम’ (पांढरे कपडे) बांधणे आदी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली
होती.
आज शेवटचे विमान रवाना होणार असल्याने जामा मशीद येथे सकाळी यात्रेकरूंच्या नातेवाईकांनी अलोट गर्दी केली होती. नातेवाईकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी जामा मशिदीजवळील रस्ते बॅरिकेड लावून बंद केले होते.
यात्रेकरूंसह बसमध्ये बसताच अनेक नातेवाईकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. पवित्र हज यात्रा ४० दिवसांची असते. यात्रेकरू सुखरूप यावेत हीच प्रार्थना नातेवाईकांसह आप्तस्वकीय करीत होते. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व यात्रेकरू चिकलठाणा विमानतळात दाखल झाले.
मराठवाडा आणि आसपासच्या जिल्ह्यातील हज यात्रेकरूंना पूर्वी मुंबई येथून विमानाने यात्रेला जावे लागत होते. यात्रेकरूंची ही गैरसोय लक्षात घेऊन २००५ मध्ये शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी थेट औरंगाबादहून विमानसेवा सुरू केली. तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या सहकार्याने औरंगाबादहून विमानसेवा सुरू झाली.
राजेंद्र दर्डा यांच्याकडून शुभेच्छा!
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सायंकाळी चिकलठाणा विमानतळावर सर्व यात्रेकरूंची भेट घेतली.
यात्रेकरूंना हज यात्रा सुखरूप व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मरकज- ए- हुजाज कमिटीचे करीम पटेल उपस्थित होते.