जिल्ह्यामध्ये गणेशमूर्तींचे काम अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: August 24, 2014 00:36 IST2014-08-24T00:36:55+5:302014-08-24T00:36:55+5:30
प्रसाद आर्वीकर, परभणी जिल्ह्याला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत़

जिल्ह्यामध्ये गणेशमूर्तींचे काम अंतिम टप्प्यात
प्रसाद आर्वीकर, परभणी
जिल्ह्याला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत़ हा उत्सव एक आठवड्यावर येऊन ठेपल्याने मूर्तीकार मंडळींची लगबग सुरू झाली असून, गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्यात कारागीर मग्न आहेत़
दरवर्षी जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो़ गणेशोत्सवानंतर गौरींचे आगमन होते आणि सणाला प्रारंभ होतो़ गणेशोत्सवाची धामधूम औरच असते़ या उत्सवाच्या निमित्ताने बालगोपाळांपासून युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण असते़ यावर्षी २९ आॅगस्ट रोजी श्रींची स्थापना होत आहे़ १० दिवस हा उत्सव चालणार असून, यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते़ गणेश मंडळांची नोंदणी आता सुरू झाली आहे़ धर्मादाय आयुक्त कार्यालयांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी केली जाते़ त्याचप्रमाणे नजिकच्या पोलिस ठाण्यामध्ये देखील मंडळाची नोंदणी करावी लागते़ गणेश मंडळांचे पदाधिकारी नोंदणीचे काम करण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालय आणि पोलिस स्थानकांमध्ये गर्दी करीत आहेत़ दुसरीकडे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी शहरातील बाजारपेठ सजू लागली आहे़ गणेशोत्सवासाठी लागणारे आराशीचे साहित्य तसेच पुजेसाठी लागणारे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे़ आठवडा बाकी असून, तयारी मात्र आतापासूनच सुरू झाली आहे़