वैद्यकीय महाविद्यालय स्थलांतर प्रक्रिया अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: August 17, 2014 00:54 IST2014-08-17T00:45:48+5:302014-08-17T00:54:50+5:30
नांदेड : डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विष्णूपुरी येथील संकुलात स्थलांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे़

वैद्यकीय महाविद्यालय स्थलांतर प्रक्रिया अंतिम टप्प्यात
नांदेड : डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विष्णूपुरी येथील संकुलात स्थलांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे़ चालू महिन्यात येत्या चार ते पाच दिवसांत स्थलांतरणासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून याबाबत पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांनी आढावा बैठक घेतली़
गेल्या अनेक वर्षांपासून विष्णूपुरी येथे सुरु असलेल्या महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्थलांतरणाचा मुद्दा रखडला होता़ त्यात आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे़ त्यामुळे वरिष्ठ पातळीवरुन त्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत़
त्या पार्श्वभूमीवर चालू महिन्यातच स्थलांतरण करण्यावर जोर देण्यात येत आहे़ त्यासंदर्भात पालकमंत्री सावंत यांनी महावितरण, सार्वजनिक बांधकाम, मनपा आरोग्य विभाग, पाणीपुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली़
बैठकीत समारंभस्थळी उभारण्यात येणारा शामियाना, परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी, व्यासपीठ, सुरक्षा व्यवस्था, वाहतुक व्यवस्था, वाहनतळ आदींबाबत यंत्रणेला निर्देश देण्यात आले़ या स्थलांतर समारंभासोबतच शहरातील उद्योग भवन तसेच आरटीओ कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण, ३५ कोटी रुपयांच्या पश्चिम वळण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, सेफ सिटी प्रकल्प अशा अन्य कार्यक्रमाच्या तयारीबाबतही सावंत यांनी सुचना दिल्या़
बैठकीला जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया, अधिष्ठाता डॉ़ दिलीप म्हैसेकर, प्रभारी आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे, कार्यकारी अभियंता जी़एच़ राजपूत, सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ़व्ही़पीक़ंदेवाड, डॉ़ डी़ बी़ जोशी यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)