जळकोट शहराची दीड कोटींची नळयोजना अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: June 22, 2015 00:20 IST2015-06-21T23:56:24+5:302015-06-22T00:20:12+5:30
जळकोट : तालुका मुख्यालय असलेल्या जळकोट शहराची तीव्र पाणीटंचाई समस्या लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशनात आमदार डॉ. सुधाकर भालेराव

जळकोट शहराची दीड कोटींची नळयोजना अंतिम टप्प्यात
जळकोट : तालुका मुख्यालय असलेल्या जळकोट शहराची तीव्र पाणीटंचाई समस्या लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशनात आमदार डॉ. सुधाकर भालेराव यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून टंचाईग्रस्त गावांसाठी तात्पुरत्या स्वरुपाची पूरक नळयोजना मंजूर करून घेतली असून, दीड कोटींची ही नळयोजना अंतिम टप्प्यात आहे. या योजनेमुळे जळकोट शहरवासीयांना जून महिनाअखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाणी मिळणार आहे.
जळकोट शहराला पाणीपुरवठा करणारे सर्व उद्भव कोरडेठाक पडले आहेत. ढोरसांगवी, करंजी, सोनवळा साठवण तलावातील पाणी आटल्याने नागरिकांची समस्या वाढली. पाणीटंचाई निवारण करण्यासाठी अन्य कोणताही उपाय नसल्याने जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथील सुमारे ८ कि.मी. अंतरावरील धरणातून ही पूरक नळयोजना प्रस्तावित करण्यात आली आहे. जळकोटकरांसाठी अत्यावश्यक बाब म्हणून ही नळयोजना तात्काळ मंजूर व्हावी, यासाठी आ.डॉ. सुधाकर भालेराव यांनी नागपूर येथील विधि मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सातत्याने पाठपुरावा केला.
पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना साकडे घालीत संपूर्ण मराठवाड्यातून ही नळयोजना खास बाब म्हणून एकमेव जळकोट शहरासाठी मंजूर करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे १ कोटी ४२ लाख रुपये किंमतीची ही नळयोजना कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून अवघ्या १८ दिवसांत पूर्ण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या नळयोजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी आ.डॉ. सुधाकर भालेराव, लातूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, मुख्य कार्यकारी अधिकारी शाम पटवारी, न.प. प्रशासक तथा तहसीलदार अविनाश कांबळे, जि.प. सदस्य चंदन पाटील, उपअभियंता कुंभारे, शाखा अभियंता गोविंद नरवटे यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. उपअभियंता कुंभारे व शाखा अभियंता नरवटे हे नळयोजनेच्या कार्यस्थळावर तळ ठोकून आहेत. तात्पुरत्या स्वरुपाची ही नळयोजना भविष्यात कायमस्वरुपी होण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत, असे सांगण्यात आले.
रावणकोळा साठवण तलावात मुबलक पाणीसाठा असल्याने जळकोटकरांना आता भविष्यात पाणीटंचाईची समस्या सुटणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)
आ.डॉ. सुधाकर भालेराव यांच्या सूचनेनुसार भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष खादर लाटवाले, भाजपा तालुका उपाध्यक्ष अजिज मोमीन यांच्या निगराणीत काम करून घेण्यात येत आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत नळयोजनेचे उद्घाटन होणार असल्याचे आ.डॉ. भालेराव यांनी सांगितले. जून अखेर पाणी मिळण्याचे संकेत दिल्यामुळे जळकोटवासीयांतून आनंद व्यक्त होत आहे.