वस्तीशाळा शिक्षकांना अंतिम नोटीस
By Admin | Updated: July 20, 2015 00:54 IST2015-07-20T00:16:49+5:302015-07-20T00:54:02+5:30
बीड : नियुक्त्यात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवून वस्तीशाळा शिक्षकांना सोमवारी अंतिम नोटिसा बजावण्यात येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने

वस्तीशाळा शिक्षकांना अंतिम नोटीस
बीड : नियुक्त्यात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवून वस्तीशाळा शिक्षकांना सोमवारी अंतिम नोटिसा बजावण्यात येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १३ जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार सीईओ नामदेव ननावरे यांनी कारवाईच्या हालचालींना वेग दिला आहे.
जिल्ह्यातील ७९३ वस्तीशाळा शिक्षकांच्या नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ९०० वर शिक्षकांमुळे वस्तीशाळा शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या नियुक्त्यांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने वस्तीशाळा शिक्षकांचा हिरमोड झाला आहे.
२३ एप्रिल २०१५ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे कक्षाधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी वस्तीशाळा शिक्षकांचे नियुक्ती आदेश रद्द करावा असे आदेश काढले. त्याला शिक्षकांनी आक्षेप नोंदवित उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात देखील वस्तीशाळा शिक्षकांची निराशा झाली.
दरम्यान, खंडपीठाच्या आदेशानुसार वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने अंतिम नोटिसा देण्यात येणार आहेत. यामध्ये नियुक्ती कधी झाली होती ? सेवा किती दिवस बजावली ? मानधन किती मिळाले ? कोठे नियुक्ती झाली होती ? आदी माहिती जाणून घेतली जाणार आहे. सात दिवसात म्हणणे मांडावयाचे आहे. वस्तीशाळा शिक्षक नोटिसांना काय उत्तरे देतात व या संदर्भातील अंतिम निर्णय काय होतो ? याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
अंतिम नोटिसा बजावण्याच्या हालचालीने वस्तीशाळा शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाने आत्महत्या केलेली असल्याने हा प्रश्न आधीच गंभीर बनलेला आहे. (प्रतिनिधी)