औषधी भवनला मनपाकडून अखेरचा ‘डोस’
By Admin | Updated: May 26, 2016 23:49 IST2016-05-26T23:49:30+5:302016-05-26T23:49:30+5:30
औरंगाबाद : दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नागरिक आणि पालिकेत नालेसफाईवरून वाद निर्माण करणारी औषधी भवनची बहुमजली इमारत अखेर कारवाईच्या चक्रव्यूहात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

औषधी भवनला मनपाकडून अखेरचा ‘डोस’
औरंगाबाद : दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नागरिक आणि पालिकेत नालेसफाईवरून वाद निर्माण करणारी औषधी भवनची बहुमजली इमारत अखेर कारवाईच्या चक्रव्यूहात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नोटीस रुपाने पालिकेने औषधी भवनला अखेरचा ‘डोस’ दिला आहे. औषधी भवनची इमारत ७ दिवसांत रिकामी करण्याची नोटीस गुरुवारी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी भवनच्या अध्यक्षांना बजावली आहे. नाल्याचा श्वास कोंडून त्या इमारतीचे मजले उभे राहिल्याने दलालवाडी, दिवाण देवडी, गुलमंडी, औरंगपुऱ्यासह अनेक भागांत पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याचे वास्तव सर्वश्रुत आहे.
नाल्यावरची जागा भाड्याने देताना करण्यात आलेल्या करारातील ३ अटींचा भंग केल्याचा ठपका प्रशासनाने नोटीसमध्ये ठेवला आहे. इमारत रिकामी झाल्यानंतर लवकरच पाडण्याचा विचार प्रशासन करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी नाल्यातील अतिक्रमणांचा विषय चर्चेला येतो.
पालिकेच्या मान्सूनपूर्व बैठकीत औषधी भवनचा विषय यावर्षीही चर्चेला आला. पाऊस मोठा असो की छोटा औषधी भवनच्या इमारतीमुळे वर उल्लेख केलेल्या भागात शेकडो घरांमध्ये पाणी घुसते. त्यानंतर पदाधिकारी पाहणी करून छायाचित्र काढतात. प्रत्येक वर्षी हेच करायचे काय, प्रशासन कारवाई का करीत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला होता. त्यानंतर आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी इमारतीची पाहणी करून परिस्थिती गंभीर आहे, कारवाई करावीच लागेल, असा इशारा देऊन कराराला मुदतवाढ देण्यास नकार दिला होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मनपा अधिकाऱ्यांच्या पथकाने इमारतीची पाहणी केली. गुरुवारी आयुक्तांना अहवाल सादर केला. त्यानुसार सायंकाळी केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षाला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात ७ दिवसांच्या आत इमारत रिकामी करण्यात यावी, अन्यथा होणाऱ्या नुकसानीस व जीवित हानीस आपण जबाबदार असाल, असा इशारा देण्यात आला आहे.
ही ती इमारत... गोमटेश मार्केटमधील औषधी भवनची ही इमारत. इमारत नाल्यावर असून तिच्या मागे तुंबलेला नाला. इमारत आणि नाल्यात शिल्लक राहिलेले अंतरच सर्व वास्तव दाखवून जाते.