आॅनलाइन नोंदणीचा आज अखेरचा दिवस
By Admin | Updated: June 27, 2017 01:04 IST2017-06-27T00:59:16+5:302017-06-27T01:04:34+5:30
औरंगाबाद : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

आॅनलाइन नोंदणीचा आज अखेरचा दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून, उद्याचा २७ जून हा आॅनलाइन नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस आहे. जे विद्यार्थी भाग एक आणि भाग दोननुसार आॅनलाइन नोंदणी करणार नाहीत, त्या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश दिला जाणार नाही.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गेल्या दहा दिवसांपासून आॅनलाइन प्रवेशासाठी स्वतंत्र वेबसाइट सुरू केलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतून किंवा झोन केंद्रातून या वेबसाइटवर इयत्ता अकरावीसाठी आॅनलाइन नोंदणी करायची आहे. ज्यांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे; पण नोंदणी करताना भाग एक आणि भाग दोन अपूर्ण राहिलेली असतील, हे दोन्ही भाग पूर्ण व अचूक भरणे आवश्यक आहे. मनपा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ शाळेतून, तर मनपा क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही झोन केंद्रामध्ये आवश्यक कागदपत्रे दाखवून उद्या दुपारी चार वाजेपर्यंत दोन्ही भागांत आॅनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे.
आॅनलाइन प्रवेश अर्ज भरताना काही चूक झाली असल्यास तीदेखील मूळ शाळेत किंवा झोन केंद्रावर जाऊन दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. यंदा अकरावीसाठी राबविण्यात येणाऱ्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. महापालिका कार्यक्षेत्रात एकूण १०४ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
या महाविद्यालयांमध्ये कला शाखेला ७ हजार ४४० विद्यार्थी, विज्ञान शाखेला १० हजार १२० विद्यार्थी, वाणिज्य शाखेला ३ हजार ४८० आणि एमसीव्हीसी शाखेला १ हजार ९२० विद्यार्थी, अशी एकूण २२ हजार ९४० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. यापैकी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १३ हजार ३०, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ८ हजार ५७० आणि स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १४०० एवढी प्रवेश क्षमता आहे.