शेवटचा दिवस गोंगाटाचाच
By Admin | Updated: October 14, 2014 00:31 IST2014-10-14T00:15:57+5:302014-10-14T00:31:55+5:30
जालना : गळ्यात रुमाल... डोक्यावर टोपी... खांद्यावर झेंडे फडकवित जयघोष करणारे निष्ठावंत कार्यकर्ते... गल्लीबोळापासून ते रस्त्या-रस्त्यांवर कर्णकर्कश आवाजात फिरणारे भोंगे

शेवटचा दिवस गोंगाटाचाच
जालना : गळ्यात रुमाल... डोक्यावर टोपी... खांद्यावर झेंडे फडकवित जयघोष करणारे निष्ठावंत कार्यकर्ते... गल्लीबोळापासून ते रस्त्या-रस्त्यांवर कर्णकर्कश आवाजात फिरणारे भोंगे, चौका-चौकातील गोंगाट अन् व्यापारीपेठा व नागरी वसाहतीमधून पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे उमेदवारांसह कट्टर समर्थक कार्यकर्त्यांच्या धावत्या पदयात्रा, असे शहरी व ग्रामीण भागातील लगिनघाईचे हे चित्र होते.
गेल्या तेरा दिवसातील प्रचार युध्दास सोमवारी ५ च्या सुमारास पूर्णविराम मिळाला खरा; परंतू प्रचाराच्या या अंतिम दिवसाचा जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या मातब्बर उमेदवारांसह पुढारी व समर्थक कार्यकर्त्यांनी पुरेपूर असा फायदा उठविला. विशेषत: सकाळी ७ वाजल्यापासूनच हे मातब्बर घराबाहेर पडले. विश्वासू कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केल्यापाठोपाठ काहींनी ठरविलेल्या शक्तीप्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. पाठोपाठ जुन्या व नविन वसाहतीतील सर्वसामान्य मतदारांच्या गाठीभेटींची मालिका सुरु केली. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे हे उमेदवार व त्यांचे समर्थक वसाहतींमधून पदयात्रांद्वारे फेरफटका मारीत होते. यातील काहींनी दुपारी नियोजित स्थळ गाठून मिरवणूकांद्वारे शक्तीप्रदर्शनास सुरुवात केली. तर काहींनी शक्ती प्रदर्शने टाळून उर्वरित भागांचा प्रचार दौरा सुरु केला. जालन्यातील कॉँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी शहरी व ग्रामीण भागाचाही सोमवारी दौरा केला. शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी कन्हैय्यानगरपासून पदयात्रा काढली. दोन डझन वसाहतींतून ती पदयात्रा निघाली होती. भाजपाचे उमेदवार अरविंद चव्हाण यांनी शहरातून मोठी रॅली काढली. त्याद्वारे जुन्या व नविन जालन्यातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. भोकरदनमधून संतोष दानवे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. (प्रतिनिधी)
शहरी व ग्रामीण भागात ३ चाकी व ४ चाकी प्रचार रथ सकाळपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत गल्लीबोळापासून मुख्य रस्ते व चौका-चौकातून फिरतीवर होते. त्यावरही ध्वनीक्षेपकाद्वारे मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होत होता. कर्नकर्कश आवाजातील उद्घोषणा, घोषणा तसेच आरोप-प्रत्यारोपाच्या गोंगाटाने चौक व रस्ते दणाणून गेले हेते.
४काही उमेदवारांनी दुचाकी रॅली काढली. त्यात युवकांचा सहभाग मोठा होता. गळ्यात रुमाल, डोक्यावर टोप्या, खांद्यावर झेंडे फडकवित हे युवक संपूर्ण शहरातील नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होते. ग्रामीण भाग या शक्तीप्रदर्शनाने गजबजला होता.