वसतिगृहातील जेवणात निघाल्या अळ्या !
By Admin | Updated: April 19, 2015 00:48 IST2015-04-19T00:45:35+5:302015-04-19T00:48:07+5:30
उस्मानाबाद : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जेवणातील दह्यामध्ये अळ्या निघाल्या.

वसतिगृहातील जेवणात निघाल्या अळ्या !
उस्मानाबाद : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जेवणातील दह्यामध्ये अळ्या निघाल्या. हा गंभीर प्रकार १८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास समोर आला. विशेष म्हणजे, या बाबत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर पथकाने शुक्रवारी वसतिगृहामध्ये जाऊन तपासणी केली होती. त्यानंतर लागलीच दुसऱ्यादिवशी हा प्रकार समोर आल्याने प्रशासन विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत किती गंभीर आहे? याची प्रचिती येते.
आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह सुरू करण्यात आले. येथे शिक्षण, निवासासोबतच जेवणाचीही सुविधा पुरविण्यात येते. त्यामुळे वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु, येथे वास्तव्यास असलेल्या या विद्यार्थ्यांना शासनाच्या निकषानुसार सुविधा मिळत नाहीत, अशी ओरड मागील काही दिवसांपासून सुरू होती. विशेषत: जेवणातबाबत विद्यार्थ्यांच्या अधिक तक्रारी होत्या. अखेर काही विद्यार्थ्यांनी धाडस करून थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज दाखल केला. याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांना वसतिगृहाची पहाणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार डॉ. सातपुते यांनी १७ एप्रिल रोजी वसतिगृहाची तपासणी केली. तपासणीनंतर लागलीच दुसऱ्या दिवशी शनिवारी प्रशासनाचा निष्काळजीपणा उजेडात आला. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या जेवणाची वेळ झाल्यानंतर त्यांना चपाती, भाजी, भात आणि दही वाढण्यात आले. त्यानंतर लागलीच विद्यार्थ्यांनी जेवणाला सुरूवात केली असता दह्यामध्ये अळ्या असल्याचे एका विद्यार्थ्याच्या निदर्शनास आले. हा प्रकार वॉर्डनच्या लक्षात आणून दिल्यानंतर लागीच ते फेकून देण्यात आले. विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी संबंधित कर्मचारी आणि ठेकेदार मुलांच्या जेवनाबाबत किती दक्ष आहेत? हेच या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
सततच्या प्रकाराने विद्यार्थी त्रस्त
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नाही. त्यांची व्यथाही कोणीही ऐकत नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. त्यांच्या आदेशावरून वसतिगृहाची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीनंतर लागलीच दुसऱ्याच दिवशी दह्यामध्ये अळ्या निघाल्याने प्रशासनाच्या जबाबदारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सततच्या प्रकारामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या जेवणातील दह्यामध्ये अळ्या निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर समाजकल्याण अधिकारी एस. के. मिनगिरे यांनी वसतिगृहाला भेट देऊन पहाणी केली. प्रकार घडला असल्याचे सांगत संबंधित ठेकेदार आणि वॉर्डनला नोटिसा देण्यात आल्या आहेत. संबंधितांकडून याबाबत खुलासा आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मिनगिरे म्हणाले.
वसतिगृहाचे अधीक्षक बप्पा नाईकनवरे यांना विचारले असता, दह्यामध्ये अळ्या असल्याचे मुलांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर लागीच दही फेकून देण्यात आले. मुलांच्या आहाराबाबत आम्ही दक्षता घेतो. असे प्रकार झाल्यास समाजकल्याण विभागाला कळवून नोटीस देण्यात येते, असे त्यांनी सांगितले. नाईकनवरे यांच्या म्हणण्यानुसार ते दक्षता घेत असतील, तर असे प्रकार का घडतात? विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार का नोंदवावी लागते? असे एक ना एनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.