आंब्यांची परराज्यातूनच मोठी आवक

By Admin | Updated: May 14, 2014 00:40 IST2014-05-14T00:37:00+5:302014-05-14T00:40:50+5:30

जालना : शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमधून यावर्षी जिल्हा, विभाग किंवा राज्याबाहेरच्या आंब्याचीच मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे.

Larger arrivals than mangoes | आंब्यांची परराज्यातूनच मोठी आवक

आंब्यांची परराज्यातूनच मोठी आवक

जालना : शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमधून यावर्षी जिल्हा, विभाग किंवा राज्याबाहेरच्या आंब्याचीच मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. गेल्यावर्षी या जिल्ह्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे जिल्हावासिय त्या दुष्काळाने होरपळून निघाले होते. विशेषत: टंचाईने हैराण होते. अपुर्‍या पावसाने व तीव्र टंचाईने जिल्ह्याचे जनजीवनच ठप्प होते. त्याचा परिणाम म्हणजे गेल्यावर्षी बाजारपेठांमधूनसुद्धा कमालीचा शुकशुकाट होता. त्याचा फटका आंब्याच्या बाजारपेठेने अनुभवला. गेल्यावर्षीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्वदूर बर्‍यापैकी पाऊस झाल्यानंतर शेतकरी सुखावला होता. खरिपापाठोपाठ रबीनेही आशा उंचावल्या होत्या. उन्हाळी पिकांबरोबरच यावर्षी आंबाही बहार आणेल, असा अंदाज व्यक्त होत असताना या जिल्ह्यास वादळी वार्‍यांसह गारपिटीने एकदा नव्हे सहा वेळा झोडपून काढले. घनसावंगी, अंबड, बदनापूर, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद या आठही तालुक्यांत सर्वदूर हेच चित्र होते. त्यामुळे रबी व उन्हाळी पिके जमीनदोस्त झाली. त्याचबरोबर आंब्याच्या झाडांना आलेला मोहर पूर्णत: गळून पडला. काही भागात पाना फुलांची मोठ्या प्रमाणावर गळती झाली. झाडे बोडखी झाली. काही ठिकाणी तर झाडेही उन्मळून पडली. या पार्श्वभूमीवरच याही वर्षी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठेवर आंब्याचा तुटवडा जाणवणार, हे स्पष्ट होते. अपेक्षेप्रमाणे अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर आंब्याची म्हणावी एवढी आवक झाली नाही. त्यामुळे आंब्याचे भाव कडाडले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक बाजारपेठेत जिल्ह्याबाहेरच्या विशेषत: राज्याबाहेरच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश इ. राज्यांतून आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. गुजरातमधून केशर व दसेरी आंबे मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. दररोज जालना किंवा अन्य तालुकास्थानी किमान डझनभर ट्रकव्दारे हा आंबा दाखल होत असून, तो हातोहात विकलाही जात आहे. काही भागात आंध्रमधून बदाम प्रकाराचा आंबा दाखल झाला असून, केशर आणि दसेरीच्या तुलनेत हा आंबा स्वस्त आहे. (प्रतिनिधी) आंब्याच्या बाजारपेठेत सध्या ६० ते ८० रुपये किलो प्रमाणे दर असून, हे दर आणखी उतरतील असा अंदाज आंबा विक्रेते करीत आहेत. यावर्षी कोकणातून मोठ्या प्रमाणावर हापूस व देवगड, पायरी, आंबा दाखल होईल, असा अंदाजही काही व्यापार्‍यांनी वर्तविला असून, कोकणातून परदेशात जाणार्‍या आंब्याची निर्यात थांबल्यानेच हापूसची आवक वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फळविक्रेत्यांनी आंबा पिकविण्यासाठी कार्बाईडचा मुक्तपणे वापर सुरू केला आहे. त्यामुळे बाजारपेठांतून कलमी असो की अन्य आंबे पिवळे भडक दिसू लागले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने काही दिवसांपूर्वी फळविक्रेत्यांना इशारा दिला होता खरा, परंतु त्यांच्या विरोधात आजपर्यंत औषधालाही कारवाई न केल्याने जागरूक ग्राहकांतून खंत व्यक्त केली जात आहे.

Web Title: Larger arrivals than mangoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.