घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा साठा जप्त
By Admin | Updated: October 8, 2014 01:06 IST2014-10-08T00:48:29+5:302014-10-08T01:06:32+5:30
औरंगाबाद : ऐन सणासुदीच्या काळात आधीच घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई भासत आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा साठा जप्त
औरंगाबाद : ऐन सणासुदीच्या काळात आधीच घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई भासत आहे. अशा परिस्थितीत काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी बीडहून आणण्यात आलेला घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा साठा गुन्हे शाखा पोलिसांनी चिकलठाण्याजवळ सापळा रचून पकडला.
पन्नास गॅस सिलिंडरसह एक जीप पोलिसांनी जप्त केली असून हे सिलिंडर आणणाऱ्या अनिल रमणलाल चुडीवाल (३२, रा. बायजीपुरा) याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईबाबत माहिती देताना गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, एमएच- २०, डीई- १२३६ या क्रमांकाच्या बोलेरो जीपमध्ये बीडहून घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा साठा आणण्यात येत आहे. हे सिलिंडर औरंगाबादेत काळ्याबाजारात विकण्यात येणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे फौजदार गिरिधर ठाकूर यांना खबऱ्याकडून मंगळवारी मिळाली. माहिती मिळताच फौजदार ठाकूर, रणजितसिंह राजपूत, प्रदीप गोमटे, दत्तू सांगळे, अप्पासाहेब खिल्लारी, शेख नबाब यांनी सकाळी जालना रोडवर चिकलठाण्याजवळ सापळा रचला. सोबत पुरवठा विभागाच्या पथकालाही घेण्यात आले.
सकाळी साडेअकराच्या सुमारास बीडकडून खबऱ्याने सांगितलेल्या क्रमांकाची जीप येताना पोलिसांच्या नजरेस पडली. जीपमध्ये गॅसचे सिलिंडरही होते. पोलिसांनी ही जीप अडविली. चालक अनिल चुडीवाल याला ताब्यात घेतले. त्याला ‘खाक्या’ दाखवून विचारपूस करताच हे सिलिंडर काळ्याबाजारात विक्रीसाठी आपण आणले होते, अशी कबुली त्याने दिली.
त्यावरून आरोपी चुडीवाल याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातील जीप व ५० सिलिंडर जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.