नगररोडवरील गोडाऊनला मोठी आग
By Admin | Updated: November 3, 2016 01:34 IST2016-11-03T01:28:44+5:302016-11-03T01:34:25+5:30
औरंगाबाद : नगररोडलगत बजाजच्या मटेरियल गेटसमोर बाफना मोटारशेजारील इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला बुधवारी (दि.२) रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

नगररोडवरील गोडाऊनला मोठी आग
औरंगाबाद : नगररोडलगत बजाजच्या मटेरियल गेटसमोर बाफना मोटारशेजारील इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला बुधवारी (दि.२) रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. गोडाऊनमधील एलईडी, फ्रीज, ए. सी., मायक्रोओव्हन, वॉशिंग मशीन आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशमन विभागाचे ४ बंब करीत होते.
आगीमुळे गोडाऊनमधील इलेक्ट्रॉनिक उपकरणांतील सिलिंडर, कॉम्प्रेसरचे स्फोट सुरू होते.
गोदाममालक शेजूळ व इन्चार्ज मुकुंद शेवतेकर हे सायंकाळी ७.३० वाजता गोदाम बंद करून घरी निघून गेले होते. गोदामाला आग लागल्याची माहिती सुरक्षारक्षकांनी शेवतेकरांना व अग्निशमन विभागाला दिली.
आगीचे रौद्ररूप पाहता गोडाऊनच्या बाजूला राहत असलेल्या अनेकांनी घरातून पळ काढला व दारासमोर उभी केलेली वाहने सुरक्षितस्थळी नेण्यात आली. प्रारंभी एकच अग्निशमन विभागाच गाडी आगीशी झुंज देत होती;परंतु आग पुन्हा भडकत होती. त्यामुळे चार बंब पाठविण्यात आले. नागरिकही मदत करीत होते. परिसरातील बहुतांश नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
या गोदामाचे प्रमुख मुकुंद शेवतेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, गोदामात इलेक्ट्रॉनिक वस्तू असून, येथूनच माल पुरवठा केला जात होता. आगीत नेमके किती नुकसान झाले हे सध्या सांगता येणार नाही; परंतु नुकसानीचा आकडा मोठा आहे.
सातारा, एमआयडीसी वाळूज, वाळूज पोलीस दाखल...
आगीची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज, वाळूज तसेच सातारा ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.